चंद्रकांतदादा मराठा आहेत याची काय व्हॅलेडिटी आहे?; मराठा क्रांती मोर्चाचा सवाल
चंद्रकांत पाटलांनी मराठा समाजाचा विश्वास गमावला. जर आमच्या काही लोकांनी काही केलं असेल तर त्यांना बघून घेण्यासाठी मराठा समाज सक्षम आहे. त्यांना समाज नक्की शिक्षा देईल.
अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे: मराठा आरक्षणा संदर्भातील (maratha resrvation) एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या नावाच उल्लेख करण्यात आला आहे. तसेच मराठा मोर्चात फूट पाडल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. चंद्रकांतदादांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्हीच मराठा समाजाला आरक्षण दिलं. मग फूट पाडण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर, दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने हा मुद्दा लावून धरत चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. चंद्रकांतदादा मराठा आहेत याची काय व्हॅलेडिटी आहे? असा सवाल मराठा क्रांती मोर्चाने (maratha kranti morcha) केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी हा सवाल केला आहे. त्या ऑडिओ क्लिपमधील माहिती समाजाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट आहे. समाजाला हरवण्याची ताकद कुण्या ऐऱ्यागैऱ्या सदावर्तेंमध्येही नव्हती. पण आमचेच काही लोक फुटीर निघाले आणि सरकारने काही लोकांना फोडलं म्हणून मराठा समाजाला त्यावेळी आरक्षण नाही मिळालं. काही जणांनी आम्हाला टेबलावर हरवलं, असं योगेश केदार यांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटलांनी केलेला गुन्हा गंभीर आहे. चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. त्यांची समितीच्या अध्यक्षपदावरून देखील हकालपट्टी करण्यात यावी. ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर जे समोर आले त्यात तथ्य आणि सत्य आहेच. सगळं काही आता समाजाच्या समोर आलं आहे, असं ते म्हणाले.
चंद्रकांत पाटलांनी मराठा समाजाचा विश्वास गमावला. जर आमच्या काही लोकांनी काही केलं असेल तर त्यांना बघून घेण्यासाठी मराठा समाज सक्षम आहे. त्यांना समाज नक्की शिक्षा देईल. चंद्रकांत दादा मराठा आहेत याची काय व्हॅलेडीटी आहे? असा सवाल केदार यांनी केला आहे.
दरम्यान, कालपासून एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. मराठा संघटनेत फुटीला चंद्रकांत पाटील हेच जबाबदार असल्याचं त्यात म्हटलं आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मराठा समाजाला सर्व आरक्षण आम्हीच दिलं. मग फूट पाडण्याचा संबंधच काय? असा सवाल पाटील यांनी केला आहे.