Eknath Shinde: महाराष्ट्राची सूत्रं पुन्हा ‘मराठा’ मुख्यमंत्र्यांच्या हाती, फडणवीसांच्या खेळीनं राष्ट्रवादी, काँग्रेसही चेकमेट?
Eknath Shinde : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा राजकारणाचा संपूर्ण बेस हा मराठा राजकारण आहे. या दोन्ही पक्षात मराठा लॉबीचं वर्चस्व आहे. त्यामुळे मराठा व्होटबँक आपल्याकडे वळवण्यासाठीच भाजपने एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मराठा मुख्यमंत्री दिला असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अखेर मुख्यमंत्री झाले आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शिंदे यांच्या रुपाने आणखी एक मराठा नेता मुख्यमंत्री झाला आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिंदे हे भाजपला पाठिंबा देतील आणि राज्यात पुन्हा फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) रुपाने ब्राह्मण मुख्यमंत्री होईल, असं सांगितलं जात होतं. पण फडणवीसांनी मास्टर स्ट्रोक लगावत शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. एकाच फटक्यात फडणवीस यांनी अनेक तीर मारले आहेत. एक म्हणजे महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री देऊन भाजप (bjp) ब्राह्मण धार्जिणी पार्टी नसल्याचं दाखवून दिलं आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीला चेकमेट दिला आहे. शिवाय साताऱ्यातील नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसवून पश्चिम महाराष्ट्रात भाजपचं जाळं विणण्यासाठी पाऊल टाकलं आहे. या शिवाय महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेही मोठी रणनीती आखली आहे. तसेच शिवसेनेला डॅमेज करण्याचाही प्रयत्न केला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा राजकारणाचा संपूर्ण बेस हा मराठा राजकारण आहे. या दोन्ही पक्षात मराठा लॉबीचं वर्चस्व आहे. त्यामुळे मराठा व्होटबँक आपल्याकडे वळवण्यासाठीच भाजपने एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मराठा मुख्यमंत्री दिला असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. या दोन्ही समाजात ठाकरे सरकारविरोधात कमालीचा रोष होता. आता शिंदे यांच्या माध्यमातून हे प्रश्न निकाली लावण्यावर भाजपचा भर असणार आहे. हे दोन्ही प्रश्न निकाली लावून मराठा आणि ओबीसी समाजाला भाजपकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.
पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवणार?
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाचं मोठं वर्चस्व आहे. शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याचे आहेत. ते मराठा समाजातील आहेत. त्यामुळे मराठा मुख्यमंत्री देऊन भाजप पश्चिम महाराष्ट्रात हातपाय पसरणार असल्याचं सांगितलं जात आहे. 2024च्या लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळावं म्हणून भाजपने आतापासूनच तयारी सुरू केल्याचंही सांगितलं जात आहे.
शिंदे सरकारमध्ये कोण कोण?
शिंदे सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखेपाटील, गिरीश महाजन, राम शिंदे, प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांची वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. तसेच शिंदे गटाचे दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, बच्चू कडू, उदय सामंत यांची वर्णी लागणार असल्याचंही सांगितलं जात आहे.