पुरुषोत्तम खेडेकरांची ऑफर आधी बघू, संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेवर भाजपची पहिली प्रतिक्रिया!
मराठा सेवा संघाचे (Maratha Seva Sangh) संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी भाजपशी (BJP) युती हाच पर्याय असा लेख लिहिल्याने राज्याच्या राजकारणात अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.
पुणे : मराठा सेवा संघाचे (Maratha Seva Sangh) संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी भाजपशी (BJP) युती हाच पर्याय असा लेख लिहिल्याने राज्याच्या राजकारणात अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. कारण स्थापनेपासून आजपर्यंत केवळ आणि केवळ संघ-भाजप रडारवर असताना, पुरुषोत्तम खेडेकर यांनी थेट भाजपशी युती करण्याचं भाष्य केल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल”
चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना संभाजी ब्रिगेडच्या बदलत्या भूमिकेवर भाष्य केलं. पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकाच्या संपादकीयमध्ये लेख लिहिला आहे. खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. पण आम्ही अद्याप कोणताही निर्णयापर्यंत आलेलो नाही. खेडेकरांची नेमकी ऑफर काय आहे ते पाहू. चर्चा करु, त्यानंतर याबाबतचा निर्णय घेऊ” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया
दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. दरेकर म्हणाले, “संभाजी ब्रिगेडने असं वक्तव केलं असेल तर त्याचं स्वागतच असेल. महाविकास आघाडीला आरक्षण राखता आलं नाही हे मराठा समाजातील लोकांना समजलं आहे. निवडणुका लढावाव्या की नाही हे वरच्या पातळीवर निर्णय घेतील. मराठा समाजातील अजून किती बळी या सरकारला हवे आहेत हा माझा प्रश्न आहे . सरकारला जाग येत नसेल तर दुर्दैव आहे”
पुरुषोत्तम खेडेकर यांच्या लेखात नेमकं काय?
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, यांच्या लेखाने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हं आहेत. कारण आगामी निवडणुकीसाठी त्यांनी चक्क भाजपसोबत युती हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड हे आता भाजपसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचं दिसून येतंय.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी काळात राजकीय वाटचाल करताना भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची भूमिका मांडली. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये संपादकीय लेख लिहिला आहे. या लेखामध्ये भाजपसोबतच्या युतीची भूमिका मांडली.
भारतीय जनता पक्ष हा अर्थातच आरएसएसच्या नेतृत्त्वातील पक्ष आहे. विशेष म्हणजे मराठा सेवा संघाची संपूर्ण मांडणी ही आरएसएस विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात आहे. मात्र तरीही पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा विचार मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
संबंधित बातम्या
‘भाजपशी युती हाच पर्याय’, संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकरांची भूमिका 360 अंशात बदलली?