महायुतीच्या सर्व नेत्यांना बुद्धी द्या; छगन भुजबळ यांचं विघ्नहर्त्या गणेशाला अजब साकडे
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज अंजिरवाडीतील गणेशाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना जागा वाटपापासून ते मराठा आरक्षणापर्यंतच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सवालही केले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विघ्नहत्या गणरायाला अजब साकडे घातले आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांना बुद्धी दे, अशी विनवणीच छगन भुजबळ यांनी गणपतीकडे केली आहे. छगन भुजबळ हे मुंबईतील अंजिरवाडीतील गणेशोत्सवात सामील झाले होते. बाप्पाच्या दर्शनानंतर मीडियाशी संवाद साधताना भुजबळांनी हे विधान केलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील आमदारांकडून बेताल विधानं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं आहे.
महायुतीच्या सर्व नेत्यांना बुद्धी द्या हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे. कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होईल असं वक्तव्य नेत्यांनी करू नये. आपल्यात भेदभाव आहे, असं चित्र जनतेसमोर आणू नका. येवढंच सांगेन, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रियाही व्यक्त केली.
जेणेकरून चुकीचं वक्तव्य करणार नाही
आमच्या महायुतीतील नेत्यांना, कार्यकर्त्यांना बुद्धी यावी, जेणे करून ते चुकीचे वक्तव्य करणार नाहीत, अशी प्रार्थना करेल. आपण सगळे एक आहोत, आणि एक होऊन विधानसभेला सामोरे जाणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
दिल्लीतून आश्वासन मिळालंय
भुजबळ यांनी यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजप असो किंवा शिंदे गट किंवा अजितदादा गट… महायुतीत सर्वांना न्याय मिळेल. दिल्लीतील नेत्यांनी सुद्धा सर्वांना आश्वासन दिलं आहे. कोणावर अन्याय होणार नाही, असं दिल्लीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. आता जे बाकीचे कार्यकर्ते, आमदार आपापल्या पद्धतीने काहीही बोलत असतील तर यावर माझं काही म्हणणं नाही, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
येणं जाणं सुरूच राहील
अजितदादा गटाचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची कन्या शरद पवार गटात जाणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बऱ्याचशा नाही, एक दोन ठिकाणी असं होणार आहे. राज्यात राष्ट्रवादीच्या दोन, शिवसेनेच्या दोन असे एकूण सहा महत्त्वाचे पक्ष आहेत. त्यामुळे तीन इकडे तर तीन तिकडे असं निवडणुकीपर्यंत होणार आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळेल असं वाटत होतं, त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच दुसरीकडे जाऊन काही लोक निवडणूक लढवणार आहेत. काहींना निवडणूक लढवायचीच आहे. त्यामुळे इथून काही तिकडे जातील, तर तिकडचे काही इकडे येतील. हे सुरूच राहणार आहे, असं भुजबळ म्हणाले.
कोणीही असं म्हणणार नाही
ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्यावं का? हा माझा महायुती असो की महाविकास आघाडी असो, दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांना सवाल आहे. कोणीही त्याला तयार नाही ही माझी खात्री आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण ते स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं पाहिजे हे सर्वांचं म्हणणं आहे. शिवाय महायुती सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.