शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार? एकनाथ शिंदे म्हणतात…
महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची मंगळवारी (11 ऑगस्ट) संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई : राष्ट्रवादीच्या आमदारांच्या तुलनेने शिवसेना आमदारांच्या कामांना हवी तशी गती मिळताना दिसत नाही, अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती समोर आली आहे. यावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत. सरकारमध्ये सत्तेत असताना आमदारांची कामे झाली पाहिजेत, अशा सूचना काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. आमदारांच्या या सूचनेवर मुख्यमंत्र्यांनी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे”, असं एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची मंगळवारी (11 ऑगस्ट) संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती बैठक पार पडली. ही रुटीन बैठक होती. या बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी ही बैठक होती. समन्वय समितीची बैठक होत राहणार”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“राज्य सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करत आहे. राज्य सरकार टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उघडून सर्वसामान्य नागरिकांना सवलत देत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पूर्ववत होण्यासाठी मदत होईल. त्याबाबत नियोजन करण्यासाठी बैठक होती”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलं.
“देशात सध्या कोरोना संकट आहे. राजकारण करण्याची किंवा कोणालाही बदनाम करण्याची ही वेळ नाही. सध्या कोरोनातून कसं मुक्त होता येईल, याबाबत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीदेखील प्रयत्न करायला हवा. ही एक सामूहिक जबाबदारी म्हणून सगळ्यांनी काम केलं पाहिजे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.