‘एकनाथ शिंदे रडणारा माणूस नाही’, ‘त्या’ गौप्यस्फोटावर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया
आदित्य ठाकरे यांनी एखनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटावर आता मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंकडून करण्यात आलेला दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल एक गौप्यस्फोट करुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदे हे बंड करण्याच्या आधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिलीय. आदित्य ठाकरे यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर वक्तव्य केलं, असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
शिंदे रडणारे नाहीत तर सामोरे जाणारे आहेत, असं शंभूराज देसाई म्हणत आहेत. शिंदे यांच्या बदनामीसाठी असे सगळे वक्तव्य केले जात आहेत, असंही ते म्हणाले आहेत. तसेच हिंमत असेल तर शिंदे रडल्याचे पुरावे द्या, असं आव्हान शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. शंभूराज देसाई यांच्या प्रतिक्रियेवर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शंभूराज देसाई नेमकं काय म्हणाले?
“आदित्य ठाकरे यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे अशाप्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. तो माणूस रडणारा नाही. कुठलाही प्रसंग आला तरी त्या प्रसंगाला सामोरे जाणारे एकनाथ शिंदे आहेत. आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना केवळ बदनाम करण्यासाठी अशाप्रकारचं वक्तव्य करत आहेत. त्यांनी हिंमत असेल तर शिंदे रडल्याचे पुरावे द्यावे”, असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे यांचा नेमका गौप्यस्फोट काय?
“हे 40 लोकं त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत. सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळी माझ्या घरी येऊन रडले होते. कारण त्यांना केंद्रीय यंत्रणा अटक करणार होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी भाजपसोबत गेलो नाही तर मला अटक होईल”, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला. त्यांचा हा गौप्यस्फोट खरा असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटावर एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. “अरे ते जाऊदे. आदित्य ठाकरे अजून लहान आहेत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्या या प्रतिक्रियेबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं. “तुम्ही विचार करा, मी जेव्हा मोठा होईल तेव्हा त्यांना माझी किती भीती वाटेल”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.