मोठी बातमी ! निर्मला सीतारामण, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह अनेकांना मंत्रीपदावरून काढणार?; भाजपचा मोठा गेम प्लान
लोकसभा निवडणुकीला अवघे नऊ महिने बाकी असल्याने भाजपने पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तब्बल पाच केंद्रीय मंत्र्यांवर राज्यात संघटनेची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कामाला लागला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप संघटनेत मोठे फेरबदल करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाच केंद्रीय मंत्र्यांचे मंत्रीपद काढून घेण्यात येणार आहेत. ज्यांची मंत्रीपदे काढून घेतली जाणार आहेत, ते सर्व मोठे नेते आहेत. या सर्व मंत्र्यांवर पक्ष संघटनेच्या कामाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार आहे. तसेच मध्यप्रदेशसहीत सहा राज्यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्षही बदलले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठा फेरबदल होणार आहे. भाजपने पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून निर्मला सीतारमण, मनसुख मांडविया, ज्योतिरादित्य शिंदे, प्रल्हाद सिंह पटेल यांना संघटनेत पाठवण्याचे संकेत मिळत आहेत. या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांच्यावर संघटनेच्या कामाची जबाबदारी देण्यात येणार आहे. पुढच्याच आठवड्यात हा संपूर्ण फेरबदल होणार आहे. पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने त्यात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फक्त नऊन महिने बाकी
लोकसभा निवडणुकीला अवघे नऊ महिने बाकी आहेत. त्यामुळे संघटनेत भाकरी फिरवून संघटना बळकट करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातसहीत सहा राज्यात नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे.
एक तास खलबतं
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघाचे सरकार्यवाह अरुण कुमार यांच्यात काल एक तास चर्चा झाली. संघटनात्मक फेरबदल आणि मंत्रिमंडळातील फेरबदलावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर नड्डा यांनी मांडविया, प्रल्हाद सिंह पटेल आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी निर्मला सीतारामण, भूपेंद्र यादव, किरेन रिजिजू, गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन मेघवाल आणि एसपी सिंह बघेल आदी अर्धा डझन मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार
पक्ष संघटना मंजबूत करण्यासाठी अनेक केंद्रीय मंत्र्यांना संघटनात्मक जबाबदारी देण्यात येणार आहे. मनसुख मांडविया किंवा पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे गुजरातची, प्रल्हाद पटेल किंवा नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे मध्यप्रदेशची संघटनात्मक जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.