Raj Thackeray | बाळासाहेबांनी मला बोलावलं, मिठी मारली अन् म्हणाले आता जा… राज ठाकरे यांनी सांगितला शिवसेना सोडतानाचा न सांगितलेला किस्सा
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि पक्षांतर्गत बंडाळीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ' गेल्या दोन तीन महिन्यापासून जे राज्यात सुरु आहे ना ते चांगलं नाही महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्रात असं कधी नव्हतं.
मुंबईः खुद्द बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हयात असताना राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर कसे पडले, या प्रसंगाचं वर्णन करणारे महाराष्ट्रात अनेक जण आहेत. अनेक अनुभवी लोक यातील बारकावे सांगत असतात. पण आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीच आतापर्यंत कधीही न सांगितलेला किस्सा सांगितला. बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा मी पक्षातून बाहेर पडणार असल्याचं कळलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांचे त्या वेळचे शब्द काय होते, याविषयी राज ठाकरे यांनी सांगितलं… शिवसेनेच्या (Shivsena) आजच्या स्थितीचा आढावा घेताना पक्षात झालेल्या बंडाचे हे प्रसंग महत्त्वाचे ठरतात. मागील दोन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांतीवर असलेले मनसे अध्यक्ष आता अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईत आयोजित केला. याप्रसंगी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
तो प्रसंग सांगताना राज ठाकरे काय म्हणाले?
शिवसेना सोडतानाच्या प्रसंगाचे वर्णन करताना राज ठाकरे म्हणाले, ‘मी म्हटलं माझं बंड लावू नका. हे सर्व जण एका पक्षात आणि सत्तेत गेले. मी बाळासाहेबांना भेटून आणि सांगून बाहेर पडलेलो आहे. जेव्हा बाळासाहेबांना कळलं हा काही पक्षात राहत नाही. माझी शेवटची भेट होती. मी आज पर्यंत कधी बोललो नाही. निघताना मनोहर जोशी माझ्यासोबत होते. जोशी बाहेर गेल्यावर बाळासाहेबांनी मला बोलावलं. असे हात पसरले मीठी मारली आणि म्हणाले जा….
तुमच्या विश्वासावर पक्ष उभा…
मनसेच्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले, ‘ बाळासाहेबांना समजलं होतं. त्यामुळे मी दगाफटका करून, पाठित खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही. बाहेर पडून कोणत्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केलाय…
हल्ली कुणीही कुणात मिसळतोय…
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि पक्षांतर्गत बंडाळीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘ गेल्या दोन तीन महिन्यापासून जे राज्यात सुरु आहे ना ते चांगलं नाही महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्रात असं कधी नव्हतं. जो मतदार आहे ना त्याने 2019 ला मतदान केलं. त्याला कळतही नसेल आपण मतदान कुणाला केलं. कोण कुणात मिसळला आणि कोण कुणातून बाहेर आला काहीच कळत नाही. हे जर खरं राजकारण वाटत असेल तर हे राजकारण नाही. ही तात्पुरती आर्थिक अडजेस्टमेंट सत्तेची अडजेस्टमेंट आहे.