मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंच्या पक्षात जोरदार इनकमिंग, ‘मातोश्री’बाहेर तुफान गर्दी
शिवसेना ठाकरे गटाला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्लायातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्व कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : मुंबई, ठाणे आणि पालघरच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी या शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. दिव्यातील भाजप नेत्या ज्योती पाटील, ठाण्याचे आम आदमी पक्षाचे नेते संजय बापेरकर आणि पालघरचे कम्युनिस्ट नेते हरिशचंद्र कोलाट यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. या तीनही महत्त्वाच्या नेत्यांसह 250 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
“मला खात्री आहे, आपण जिंकणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्र फिरताना पालघरमध्ये माझे दुर्लक्ष झाले. मी लवकरात लवकर पालघरमध्ये येणार आहे. गाठीभेटी, दौरा करणार आहे. आदिवासींचे प्रश्न असतील हे सरकारला समजत नसतील तर जनतेचा आवाज सरकारपर्यंत कसा पोहचवयाचा ते शिवसेनेला माहीत आहे. मी व्यक्तीच्या विरुद्ध नाही वृत्तीच्या विरोधात आहे. समोर दिसत असेलेली हुकूमशाही आपल्याला मोडून काढायची आहे”, असंदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.
‘…तर आपल्याला मान काढू देणार नाही’
“हुकूमशाही आज जर मोडून काडली नाही तर आपल्याला मान काढू देणार नाही. मला गुलाम होणे मान्य नाही. मी कोणालाही गुलाम होऊ देणार नाही. पालघरमधून जसे लोक आले आहेत तसे ठाण्यातूनसुद्धा लोक आले आहेत. सत्ताधारी पक्षाकडे लोक जातात. ही दुर्मिळ गोष्ट आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘अशा लोकांना राजकारणात गाडायला हे लोक शिवसेनेत येत आहेत’
एका पोश्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट असं नाव लिहिलं होतं. त्यावरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. “ही सगळ्यात संतापजनक गोष्ट आहे, जगामध्ये हिंदूह्रदयसम्राट पदवी एकमेव बाळासाहेब ठाकरेंना आहे. आता ती उपाधी चोरायला पाहत आहे. अशा लोकांना राजकारणात गाडायला हे लोक शिवसेनेत येत आहेत. हे सगळे लढणारे सैन्य माझ्यासोबत असल्यामुळे मला राजकारणातील गद्दारांना गाडायला फार वेळ लागणार नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
दिवा भाजपच्या माजी महिला अध्यक्षांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
तन्वी फाउंडेशनच्या माध्यमातून दिवा शहरातील महिलांच्या प्रश्नांवर कायम आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या तसेच दिवा भाजपच्या महिला अध्यक्षा म्हणून मागील एक वर्षापासून सक्रिय काम करणाऱ्या ज्योती पाटील यांना पक्षाने पदावरून डावल्यानंतर त्यांनी अखेर ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली. ज्योती पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते राजन विचारे, लोकसभा संपर्कप्रमुख खोत, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांच्या उपस्थितीत ज्योती पाटील ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली. यावेळी दिवा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्योती पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. दिवा शहरात पक्ष फुटीनंतर नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती, ज्योती पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, अंतर्गत राजकारणाला कंटाळून ज्योती पाटील यांनी भाजपला रामराम ठोकल्याची चर्चा दिव्याच्या राजकीय वर्तुळात आहे. यावेळी दिवा मनसेच्या मयुरी पोरजी व तेजस पोरजी यांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.