आधी अण्णा हजारे बोलले नाहीत, पण आता थेट…; संजय राऊतांचा टोला
Sanjay Raut on Anna Hajare : मणिपूरमधील हिंसाचार, व्हायरल व्हीडिओ अन् अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया; पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
मुंबई | 23 जुलै 2023 : मणिपूरमधील हिंसाचाराची धग देशभर जाणवते आहे. अशातच मणिपूरमधील एका व्हीडिओवर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलं. यावर अद्याप कारवाई का केली गेली नाही, असा जाब सर्वोच्च न्यायालयाने विचारला. त्यानंतर हा व्हीडिओ वाऱ्यासारखा पसरला. यावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही यावर भाष्य केलंय. मात्र इतके दिवस शांत असलेल्या अण्णा हजारे यांनी मणिपूरमधल्या घटनेवर भाष्य केल्याने ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
अण्णा हजारे या निमित्ताने सक्रिय आहेत, हे दिसलं… बरं झालं अण्णा काहीतरी बोलतील. गेल्या वर्षापासून आम्ही मागणी करतोय की, अण्णा हजारे यांनी काही तरी बोलावं. आता अण्णांनी थेट मणिपुरलाच हात घातला आहे. हे एक बरं झालं, असं संजय राऊत म्हणालेत.
खरं म्हणजे अशा प्रकारच्या घटना देशांमध्ये खूप घडत आहेत. जंतर-मंतरवर घडलं महिला कुस्तीपटूंच्या संदर्भातही काही भूमिका घेण्यात आली नाही. पण अण्णा हजारे यांची जी ओळख आहे ती वेगळी आहे. भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे नेते म्हणून अण्णा हजारे यांना देश ओळखतो. ते आता पुन्हा बोललेत तर ही चांगली गोष्ट आहे, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
माझी अण्णांना हात जोडून विनंती आहे हा देश वाचवायचा आहे. तुम्ही देश वाचवायची भूमिका घेतलेली आहे. आज खरी आंदोलनाची गरज आहे. अण्णा हजारे यांनी त्या काळात आंदोलन केल्यामुळे काँग्रेस सत्तेवरून गेली आणि भारतीय जनता सत्तेवर आली. आज त्याच भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारांविरोधी अण्णांनी आवाज उठवावा आणि ही गरज आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.
अण्णा हजारे यांचं वक्तव्य काय?
मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेवरून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अहमदनगरच्या राळेगणसिद्धीत माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी मणिपूरमधील घटनेवर भाषष्य केलं. महिलांची दिंड काढणं हा कधीही न पुसणार कलंक आहे. महिला म्हणजे जननी, जन्म देणारी आहे. महिलेची अशी धिंड काढणं. अन्याय,अत्याचार करणं योग्य नाही. हे सगळं शब्दात व्यक्त करता न येणारं आहे, अशा शब्दात अण्णा हजारे यांनी संताप व्यक्त केला आहे.
मणिपूरच्या व्हीडिओमध्ये काय?
मणिपूरमधील हिंसाचारादरम्यानचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली. या व्हीडिओवर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.