चारवेळा नगरसेवक झालात, आता आम्हाला संधी द्या, कार्यकर्त्याची मागणी, नागपूरच्या महापौरांची निवडणूक न लढण्याची घोषणा
एका कार्यकर्त्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संदीप जोशी यांनी यापुढे नागपूर महापालिकेची निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली (Nagpur Mayor Sandip Joshi announced will not participate for Municipal election).
नागपूर : महापौर संदीप जोशी यांनी आज (20 ऑगस्ट) वाढदिवसानिमित्त फेसबुक लाईव्हद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी एका कार्यकर्त्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संदीप जोशी यांनी यापुढे नागपूर महापालिकेची निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली (Nagpur Mayor Sandip Joshi announced will not participate for Municipal election).
“आपण चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला आहात. यापुढे आपण पुन्हा निवडणूक लढवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी द्याल?”,असा सवाल एका कार्यकर्त्याने संदीप जोशी यांना फेसबुक लाईव्हदरम्यान विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना संदीप जोशी यांनी यापुढे महापालिकेची निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं.
“प्रश्न अत्यंत वास्तविक आणि खरा आहे. अनेकदा नेत्यांनीच लढायचं आणि कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलत राहायचं हे बरोबर नाही. मला वाढदिवसानिमित्त तुम्ही शुभेच्छा दिल्या आणि हा प्रश्नदेखील विचारलात. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी आज मी कॅमेऱ्यासमोर जाहीर करतोय की, यानंतर मी महापालिकेची निवडणूक लढवणार नाही. माझ्यानंतरचा जो कुणी कार्यकर्ता असेल, जो पक्षासाठी मेहनत करतोय, तो कार्यकर्ता माझ्या जागेवर लढेल. मी त्याचं काम करेन. पण यापुढे महापालिकेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही”, असं संदीप जोशी म्हणाले.
आयुक्त तुकाराम मुंढेंवरही निशाणा
संदीप जोशी यांनी फेसबुक लाईव्हदरम्यान महापालिका आयुक्त तुकाराम मुढेंवरही निशाणा साधला. “नगरसेवकांचा किंवा सभागृहाचा जर मी प्रमुख असेल तर महापालिका आयुक्तांनी सूचना ऐकूण घेतल्या पाहिजेत. सभागृह हे धोरण ठरवणारी यंत्रणा आहे. धोरणात्मक निर्णय सभागृहाने घ्यायचे असतात. तर त्याची अंमलबजावणी प्रशासन किंवा आयुक्तांनी करायची असते. दुर्देवाने इथेच चूक होते. जनप्रतिनिधी सांगतात ते चुकीचं आणि माझं एकट्याचंच खरं, असं करुन चालत नसतं”, असा टोला संदीप जोशी यांनी लगावला.
“तुकाराम मुंढे यांची सत्तापक्षच नाही तर विरोधी पक्षासोबतही तसेच वागतात”, असं संदीप जोशी म्हणाले आहेत. “विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या भेटीसाठी तीन तास वाट पाहावी लागते. नगरसेवकांना वेळ मिळत नाही”, असं संदीप जोशी म्हणाले.
‘माझा तुकाराम मुंढेंना विरोध नाही’
“माझा तुकाराम मुंढेंना विरोध नाही, त्यांच्या धोरणांना विरोध आहे. त्यांनी काही गोष्टी चांगल्या केल्या, त्याचं समर्थन केलं. त्यांचे काही निर्णय मान्य नसतील तर त्यांना त्याबाबत पत्र लिहिण्याचं आणि सूचना देण्याचा मला अधिकार आहे. पण याचा अर्थ त्यांना विरोध आहे, असं होत नाही. चांगल्या गोष्टींना समर्थन करणार. पण, वाईट गोष्टींना विरोधदेखील करणार”, असं संदीप जोशी म्हणाले (Nagpur Mayor Sandip Joshi announced will not participate for Municipal election).
“प्रशासनाचा जो निर्णय आवडत नाही त्याला विरोध करणार. त्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लोकशाहीमध्ये आम्हा सर्वांना लोकांसमोर दर पाच वर्षांनी परीक्षेला सामोरं जावं लागतं. दर पाच वर्षांनी होणाऱ्या परीक्षेत आम्हाला पास करायचं की नापास करायचं हे जनता ठरवते. तुकाराम मुंढे काल आले, उद्या चालले जातील. याशिवाय कुठलेही आयुक्त एक, दोन किंवा तीन वर्षांनी निघून जातात. आम्ही या ठिकाणी जन्मलो, जनतेनं मोठं केलं, नागपुरातच मरणार. त्यामुळे तुकाराम मुंढेंना विरोध असण्याचं कारण नाही”, असं संदीप जोशी यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :