नेमप्लेटचे ‘राज’कारण, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची नेमप्लेट अर्ध्या तासात काढली
Maharashtra Assembly Winter Session | राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नेमप्लेटवरुन राजकारण समोर आले. शरद पवार गटाची लावण्यात आलेली नेमप्लेट काढण्यात आली.
नागपूर | 7 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राज्य विधिमंडळाचे पहिलेच अधिवेशन आजपासून सुरु झाले. अधिवेशनात शिवसेनेतील दोन गटाप्रमाणे राष्ट्रवादीतील दोन गटांना वेगवेगळे कार्यालय मिळणार की काय? अशी चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी नागपूर विधिमंडळ इमारतीत कॅबिन देण्यात आली होती. या कॅबिनवर जितेंद्र आव्हाड यांची नेमप्लेट लावण्यात आली. परंतु अवघ्या अर्ध्या तासांत ही नेमप्लेट काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाचे पडसाद या पद्धतीने अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी उमटले. परंतु नेमप्लेट लावणे आणि काढणे? याची चांगलीच चर्चा सुरु झाली होती.
दुसऱ्या गटास जागा नाहीच
राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटास विधिमंडळात जागाच दिली गेली नाही. नागपूर विधिमंडळ इमारतीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी तीन कॅबिन ठेवण्यात आल्या होत्या. पहिली कॅबिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी होती. त्यानंतर दुसरी कॅबिन अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्यासाठी होती. तिसरी कॅबिन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी होती. यामुळे जितेंद्र आव्हाड यांची नेम प्लेट गुरुवारी सकाळी लावण्यात आली. नेमप्लेट लावण्यात आल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात काढण्यात आली. मग ही नेमप्लेट लावलीच का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केवळ अजित पवार गटाची नेमप्लेट
विधिमंडळ परिसरात आता केवळ अजित पवार गटाचे कार्यालय असणार आहे, अशी शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची नेमप्लेट का काढली? या विषयावर बोलण्यास विधिमंडळ कार्यालयातील कर्मचारी तयार नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून अद्याप त्यावर प्रतिक्रिया आली नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस एकच असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु आहे. जोपर्यंत तो निकाल लागत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहे, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान शरद पवार गटाकडून यावर काय भूमिका घेतली जाते? याकडे लक्ष लागले आहे.