पंढरपूरमध्ये पराभव, आता बुलडाण्याचं दुकानही बंद व्हायला वेळ लागणार नाही, नाना पटोलेंचा राष्ट्रवादीला टोला
शिवसेना आणि राष्ट्रवादीशी हातमिळणी करुन राज्यात काँग्रेस सत्तेमध्ये आहे. असे असले तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या मित्रपक्षांवरदेखील टीका करण्याचे सोडत नाहीत. आज बुलडाण्यात बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीला चांगलंच घेरलं. त्यांनी राष्ट्रवादीचं दुकान बंद व्हायला वेळ लागणार नाही, अशी खोचक टीका केलीय.
बुलडाणा : शिवसेना आणि राष्ट्रवादीशी हातमिळणी करुन काँग्रेस राज्यात सत्तेमध्ये आहे. असे असले तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या मित्रपक्षांवरदेखील टीका करण्याची संधी सोडत नाहीत. आज बुलडाण्यात बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीला चांगलंच घेरलं. त्यांनी राष्ट्रवादीचं दुकान बंद व्हायला वेळ लागणार नाही, अशी खोचक टोला लगावलाय.
नाना पटोले काय म्हणाले ?
“पंढरपूरची जागा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिंकता आली नाही. तिथे सगळे महान नेते बसले होते. राष्ट्रवादीचं तिकीट देऊनही पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं दुकान बंद होतं. विदर्भात म्हणजेच बुलडाण्यात तर यांचं एकच दुकान आहे. विदर्भातील हे दुकान बंद व्हायल किती वेळ लागतो,” असे नाना पटोले म्हणाले. तसेच पुढे या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना राष्ट्रवादीचं दुकान विदर्भात नाही, हे इथल्या जनतेने अनेकवेळा सांगितलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे इथे दुकान आहे, हे म्हणणे चुकीचे आहे, असेदेखील पटोले यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ :
पंढरपूरच्या जागेवर राष्ट्रवादीचा पराभव
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. राष्ट्रवादीचे बडे नेते, मंत्री यांनी येथे बैठकांचा सपाटा लावला होता. मात्र मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा 3733 मतांनी विजय झाला होता. या पराभवाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता.
पंढरपूरचा दाखला देत राष्ट्रवादीला टोले
याच पराभवाचा दाखला दात नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विदर्भातून राष्ट्रवादीचा सुपडा साफ करण्याची गरज असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. राष्ट्रवादीचे बुलडाण्यातील दुकान बंद व्हायला किती वेळ लागणार आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
इतर बातम्या :
परळीत माफियाराज, पंकजांचा धनंजय मुंडेंवर घणाघात; मी थकलेली नाही, लढाई सुरू म्हणत थेट इशारा!