शिवसेना-राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, नाईलाजाने काँग्रेसही स्वबळावर मैदानात!
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या (Nandurbar Zilla Parishad Election) 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला आहे.
जितेंद्र बैसाणे, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार : महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Local body Election) पुन्हा एकदा दिसून येत आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या (Nandurbar Zilla Parishad Election) 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे नाईलाजाने काँग्रेसलाही स्वबळावर निवडणूक लढावी लागणार आहे. तर तिकडे भाजपने कोणा सोबतही युती करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रंगत वाढणार आहे. (Nandurbar ZP election Shiv Sena NCP congress BJP all party will contest election own)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर, खुल्या प्रवर्गात या जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. अद्यापही सर्वच राजकीय पक्षांना या निवडणुका रद्द होतील किंवा केल्या जाव्यात असं वाटत आहे. असं असलं तरी निवडणुका झाल्यास त्या स्वबळावर लढण्याचा नारा नंदुरबार जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी दिला आहे.
स्वबळाचा नारा
महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तर स्वतंत्र स्वबळावर निवडणूक लढण्याचा नाराही देऊन टाकला आहे. काँग्रेसची भूमिका समोर येण्याआधीच या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे नाईलाजास्तव काँग्रेसलाही स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. शिवसेनेना स्वतंत्र निवडणूक लढवून आपली ताकद जिल्ह्यात सिद्ध करेल असा विश्वास पक्षाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीची भूमिका
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही जिल्ह्यात आपलं गतवैभव प्राप्त करण्यासाठी स्वतंत्र निवडणुकीचा नारा दिला आहे. पक्षश्रेष्ठींकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आदेश देण्यात आल्या असल्याचं पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभिजीत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.
महाविकास आघाडीमध्ये बिघाडी दिसून येत असली तरी भाजप मात्र निवडणुकांसाठी तयार असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे.
या निवडणुकीच्या निकालावर नंदुरबार जिल्हा परिषदेची सत्ता कोणाच्या हाती राहील? किंवा सत्तांतर होईल का? या प्रश्नांची ही उत्तरं मिळणार आहे. भाजपला या निवडणुकीत अंतर्गत कलहामुळे संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. तर दुसरीकडे महाविकास आघाडी स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्यामुळे मतविभाजनाचा फटका त्यांना बसू शकतो.
संबंधित बातम्या
आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने पडणार, फक्त वेळेचा प्रश्न आहे; राधाकृष्ण विखे-पाटलांचं भाकीत
कुणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान होणारच, महादेव जानकरांची गर्जना