अग्रलेखावरील धमकीनंतर राणेंचा नवा ‘प्रहार’, आता उद्धव ठाकरेंकडे राऊतांचे गुपित सांगणार
राणे आणि संजय राऊत यांच्यातील वाद कायमच तापत राहिलाय. ही सर्व पार्श्वभूमी पाहिल्यास खरंच संसदेत संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यात दिलखुलास गप्पा रंगल्या असतील का?
मुंबई : “संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा तुरुंगात जाण्याचा मार्ग मी मोकळा करणार आहे. १०० दिवस जेलमध्ये जाऊन आला तर कमी वाटतायत.. मी २६ डिसेंबरचा तो अग्रलेख (Editorial) जपून ठेवलाय. मी वाचून विसरणारा नाही.लक्षात ठेवणारा आहे. वकिलांना ते पाठवून ठेवलंय. कारागृहात १०० दिवस राहिले हे ते विसरले.”
“एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. मी खासदार झालो तेव्हा संसदेत असताना राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचा. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल जे काही सांगायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. ते सांगितल्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना चपलेने नाही मारलं तर बघा…”,
या दोन बातम्या गेल्या दोन दिवसांतील आहेत. नारायण राणे शिवसेना सोडून बाहेर पडल्यानंतर राणेविरोधात शिवसेना नेहमी आक्रमक असते अन् शिवसेनेवर हल्ला करण्यासाठी भाजपमधून नारायण राणे पुढे असतात…शिवसेनेत शिवसेनाविरोधकांवर हल्ला करण्याची जबाबदारी नेहमी संजय राऊत यांच्या खाद्यांवर राहिलीय. संजय राऊत यांनी कधी माध्यमांशी बोलताना, कधी सभांमधून तर कधी सामना दैनिकातून नारायण राणे व त्यांचा मुलांना टार्गेट केलंय. त्यामुळे राणे आणि संजय राऊत यांच्यातील वाद कायमच तापत राहिलाय. ही सर्व पार्श्वभूमी पाहिल्यास खरंच संसदेत संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यात दिलखुलास गप्पा रंगल्या असतील का? हा प्रश्न निर्माण होत आहे.
राजकारणात काही शक्य असते. दोन नेते एकमेकांवर सकाळी प्रहार करतात. अन् रात्री स्नेहभोजन एकत्र करतात. चांगली मैफील रंगलेली असते. ही दुसरी बाजूही नाकारता येत नाही. यामुळे खरंच राऊत राणेंकडे काय बोलले असतील, अशी चर्चा सुरु झालीय.
नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यांतील वादाने राजकारणातील सर्व सीमा ओलांडल्या. एकमेकांवर टीका करताना दोन्ही नेत सर्व पातळी सोडून बोलताय. एकंदरीत दोन्ही नेते एकमेकांचे राजकीय आयुष्य संपवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्वच प्रकार करतील.