भाषा रामराज्याची आणि उत्तरप्रदेश-बिहारमधील जनता रामभरोसे, नवाब मलिकांचा भाजपवर घणाघात
बिहारमध्ये टेस्टींग होत नाहीय. डॉक्टर नाहीत. लोकं दिवसा डोळे उघडतात आणि संध्याकाळी मृत्यू होतोय, असं नवाब मलिक म्हणाले (Nawab Malik slams BJP)

मुंबई : बिहारमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर 40 ते 50 मृतदेह वाहत आल्याचं समोर आलंय. तेथील प्रशासनाने संबंधित मृतदेह हे उत्तर प्रदेशातून वाहून आल्याचा दावा केलाय. दुसरीकडे मृतदेहांवर अत्यंविधी करण्यासाठी लाकडं नसल्याने त्यांना नदीत टाकलं जात असल्याची प्रतिक्रिया काही लोकांनी दिली आहे. मात्र, या विषयावरुन महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये भाजपने रामराज्याची भाषा केली होती. पण भाजपाने आता दोन्ही राज्यांना रामभरोसे सोडले आहे”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे (Nawab Malik slams BJP).
नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?
“उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये नदीमध्ये प्रेते टाकलेली आढळली आहेत. यमुना नदीत आणि हमिदपूरच्या नदीत तर गंगा नदीत 40 च्यावर प्रेते दिसली आहेत. याठिकाणी परिस्थिती चांगली नाही हे यावरून स्पष्ट दिसत आहे. बिहारमध्ये टेस्टींग होत नाहीय. डॉक्टर नाहीत. लोकं दिवसा डोळे उघडतात आणि संध्याकाळी मृत्यू होतोय. प्रेते जाळण्यासाठी लाकडे नाहीत म्हणूनच नातेवाईक प्रेते नदीत टाकत आहेत, ही सत्य परिस्थिती आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.
योगी आदित्यनाथांवरही निशाणा
“उत्तरप्रदेशमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जाहिराती करून सत्यापासून लांब पळत आहेत”, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे (Nawab Malik slams BJP).
गंदा नदीत मृतदेह तरंगण्याची नेमकी घटना काय?
बिहारच्या बक्सर येथे धक्कादायक घटना समोर आलीय. बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील महादेव घाटावर मृतदेहांचा खच पडला होता. उत्तर प्रदेशातील मृतदेह येथे आणले जात आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिलीय. कोरोना काळात बक्सर जिल्ह्यातील चौसाजवळील महादेव घाटावरची छायाचित्रानं सगळेच हादरलेत. या मृतदेहांनी गंगेचा महादेव घाटच भरलाय. मात्र, या घटनेचा व्हिडीओ समोर येताच जिल्हा प्रशासनाचे हात वर केलेत.
चौसाचे बीडीओ अशोक कुमार यांनी सांगितले की, जवळपास 40 ते 45 मृतदेह असतील, जे वेगवेगळ्या ठिकाणाहून वाहून महादेव घाटावर आलेत. हे मृतदेह आमचे नाहीत, असंही जिल्हा प्रशासनानं सांगितलंय. आम्ही एक पहारेकरी ठेवलाय, ज्याच्या देखरेखीखाली लोकांना जाळलं जात आहे. अशा परिस्थितीत हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत इथे येत आहेत. या अधिकाऱ्याने सांगितले की, यूपीहून येणाऱ्या मृतदेहांना रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. अशा परिस्थितीत आम्ही या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया पार पाडत आहोत.
संबंधित व्हिडीओ : Special Report | गंगा नदीत कोरोना रुग्णांचे मृतदेह?-TV9 – YouTube
संबंधित बातमी : हृदयद्रावक! बक्सरच्या गंगा घाटावर मृतदेहांचा खच, प्रशासन म्हणे, “आमचे नव्हे, तर यूपीचे मृतदेह”