बच्चू कडूंचं आमंत्रण स्वीकारलं, महाविकास आघाडीत परत घेणार? शरद पवार म्हणाले….
बच्चू कडू यांनी शरद पवारांना आपल्या घरी येऊन चहा पिण्याचं आमंत्रण दिलं आहे. शरद पवारांनी ते आमंत्रण स्वीकारलं आहे. याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
अमरावती | 27 डिसेंबर 2023 : आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आपल्या घरी चहा पिण्यासाठी येण्याचं आमंत्रण दिलं आहे. शरद पवारांनी ते आमंत्रण स्वीकारलं आहे. शरद पवार बच्चू कडू यांच्या घरी जावून चहा पिणार आहेत, असं खुद्द शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. शरद पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते बच्चू कडू यांच्या मिळालेल्या आमंत्रणानुसार त्यांच्या घरी भेट देणार आहेत. त्यामुळे महायुतीत नाराज असलेल बच्चू कडू पुन्हा महाविकास आघाडीत येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याचबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली. “त्यांनी (बच्चू कडूंनी) असं सांगितलं की, ज्या रस्त्यावरुन मी जातोय, तिथून पाच मिनिटे चहा पिवून माझ्या घरुन जा. तर मी जाईन”, असं शरद पवार म्हणाले.
बच्चू कडू महायुतीत नाराज आहेत. अशावेळी बच्चू कडू यांना पुन्हा महाविकास आघाडीत आणण्याचे प्रयत्न केले जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी “मी त्यांच्याकडे जातोय यामागे काही राजकीय हेतू नाही. एका विधानसभेच्या सदस्याने चहाला या म्हणून सांगितलं तिथे एवढी चर्चा करण्याचं कारण नाही”, असं पवार म्हणाले. यावेळी शरद पवारांना आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. बच्चू कडू यांना महाविकास आघाडीत परत घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कसं करणार? तुमच्याकडे तशी माहिती आहे? असा प्रतिप्रश्न शरद पवारांनी विचारला.
‘इंडिया आघाडी एकत्र निवडणुकीला सामोरं जाईल’
“तीन राज्यांच्या निवडणुकीचा निकाल हा अपेक्षेप्रमाणे आला नाही ही गोष्ट मान्य करावी लागेल. पण उद्याच्या निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना अर्थ नाही, अशी स्थिती नाही. आम्ही एका विचाराने जर काम केलं तर लोक आम्हाला पर्याय म्हणून स्वीकारतील याचा विश्वास आहे. आज खऱ्या अर्थाने एकत्र निवडणुकीला सामोरं जाणं याची आवश्यकता आहे. त्यासाठी आमची खबरदारी घेण्याची नीती आणि तयारी आहे. त्या तयारीला आम्ही सुरुवात केली आहे”, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांना जागावाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचा अध्यक्ष मी आहे, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्ष, आम्ही तिघे एकत्र बसून जागावाटपाबाबतचा निर्णय घेणार आहोत”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
‘प्रकाश आंबेडकरांसोबत निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा’
शरद पवारांना वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी करुन घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “इंडिया आघाडीची बैठक झाली तेव्हा माझ्या शेजारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे होते. खर्गेंच्या अध्यक्षतेखाली ती बैठक पार पडली. त्यांना मी स्वत: सुचवलं आहे की, प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्यासह निवडणुकीला सामोरं जाता येईल तर तो फैसला आवश्य करावा. त्यानंतर बैठक झाली की नाही ते मला माहिती नाही. पण आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की, त्यांच्यासह निवडणुकीला एकत्र सामोरं जावं”, असं शरद पवार म्हणाले.
‘मला राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलं नाही’
यावेळी शरद पवार यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राम मंदिरचं निमंत्रण मला आलेलं नाही, असं स्पष्टीकरण दिलं. “ईडी, सीबीआय याचा वापर करून या एजन्सीचा फायदा घेऊन राजकारणात फायदा घेणं सुरू आहे”, अशी टीका देखील शरद पवारांनी यावेळी केली.