पवार कुटुंबाचं विसर्जन करणारा जन्माला यायचाय; राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजपला ललकारले
नव्याचे नऊ दिवस आहेत. त्यांना स्वत:ला उमेदवारी दिली नाही. पत्नीला शेवटच्या दिवशी अर्ज मागे घ्यायला सांगितलं. यांची ही पक्षातली विश्वासार्हता. यांनी काय गप्पा माराव्यात? ये म्हणावं. मी आहे खंबीर.
पुणे: राष्ट्रवादीचा (ncp) बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष दिलं आहे. बारामतीत भाजपचा विजय घडवून आणण्यासाठी भाजप आतापासूनच कामाला लागली आहे. दोन वर्षात संपूर्ण मतदारसंघ बांधून शरद पवार (sharad pawar) यांना धोबीपछाड करण्याचा भाजपचा इरादा आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या स्वत: बारामती पिंजून काढणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बारामतीत जाऊन सभा घेऊन राष्ट्रवादीला ललकारले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीकडूनही भाजपला सडेतोड उत्तर मिळत आहे. राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी तर फडणवीस आणि बावनकुळे यांचा उल्लेख काळूबाळू असा केला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. बारामतीत काळू बाळूंनी जाऊन तमाशा घातला. सांगतायेत पवार कुटुंबाच विसर्जन करणार आहोत. पवार कुटुंबाचं विसर्जन करणारा अजून जन्माला यायचा आहे. एक तरी बारामती महाराष्ट्रात उभी केली का? याचं उत्तर महाराष्ट्राला द्या, असा सवाल महेबूब शेख यांनी भाजपला केला आहे.
ये म्हणावं, मी खंबीर आहे
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. नव्याचे नऊ दिवस आहेत. त्यांना स्वत:ला उमेदवारी दिली नाही. पत्नीला शेवटच्या दिवशी अर्ज मागे घ्यायला सांगितलं. यांची ही पक्षातली विश्वासार्हता. यांनी काय गप्पा माराव्यात? ये म्हणावं. मी आहे खंबीर, असा हल्ला अजित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर चढवला.
त्यांचं सगळच जप्त झालं
बारामतीला धडका मारायला गेले. धडका मारून काय होणार आहे का? गेल्यावेळेस माझ्या विरोधात ताकदवान असेल म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्या सहीत सगळंच जप्त झालं. हे येणार, ते येणार, आम्ही त्यांच स्वागत करू. आम्हाला राष्ट्रवादी वाढवण्याचा अधिकार आहे. तसा त्यांना भाजप वाढवण्याचा आहे. संपर्क वाढवा, बुथ कमिट्या केल्या पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. भाजपनं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले आणि बारामतीला आले. मी सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात करतो. लाखांच्या मताधिक्याने निवडून आलो. महाराष्ट्रात कुठेही फिरण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आपली ताकद मोठी आहे, असंही ते म्हणाले.