Sharad Pawar : सोनिया गांधींवर भाजपचे लोक धावून गेले, राष्ट्रवादी धावली नसती तर वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती: शरद पवार
Sharad Pawar : अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. अनेक ठिकाणी सत्तेचा गैरवापर होत आहे. धमकावलं जात आहे. सत्तेचे काही गुण असतात. तसेच काही दोषही असतात. केंद्रीत झालेली सत्ता सामान्य माणसाला त्रास देत असते. सगळी सत्ता मुठीत ठेवण्यासाठी, संबंध देशाचे मालक आम्हीच आहोत असं चित्र निर्माण केलं जातंय.
जळगाव: काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी राष्ट्रपतींचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. त्यावर भाजपने (bjp) जोरदार आक्षेप घेतला आहे. तसेच या मुद्द्यावरून संसदेतही गदारोळ झाला. संसदेत घडलेला प्रकारच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी कथन केला. काँग्रेसच्या खासदाराने राष्ट्रपत्नी म्हणून चूक केली. त्यांनी नंतर माफी मागण्याची तयारीही दाखवली. पण भाजप नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या माफीची मागणी केली. बोलले एक आणि माफी मागण्याची मागणी सोनिया गांधींकडे केल्या गेली. त्यावर मी माफी का मागावी? असा सवाल सोनिया गांधी यांनी केल्यावर त्यांच्यावर लोक धावून गेले. राष्ट्रवादीच्या खासदारांनी सोनिया गांधींना तिथून बाहेर काढलं. अन्यथा एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती, असं शरद पवार म्हणाले. जळगावात जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी हा प्रकार सांगितला.
अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. अनेक ठिकाणी सत्तेचा गैरवापर होत आहे. धमकावलं जात आहे. सत्तेचे काही गुण असतात. तसेच काही दोषही असतात. केंद्रीत झालेली सत्ता सामान्य माणसाला त्रास देत असते. सगळी सत्ता मुठीत ठेवण्यासाठी, संबंध देशाचे मालक आम्हीच आहोत असं चित्र निर्माण केलं जातंय. वेगळ्या रस्त्याने हा देश चालवणार हे दाखवण्याचं काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. काय पडेल ती किंमत देऊ पण या देशाच्या लोकशाहीचं जनत करू. अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात एकसंघ राहून संघर्ष करू, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
इंग्रजांनाही जावं लागलं
ज्यांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता असे इंग्रज या देशात होते. पण गांधींच्या नेतृत्वात देशाने एकजूटता दाखवली आणि इंग्रजांना या देशातून घालवलं. इंग्रजांचा पराभव या देशातील सामान्य माणूस करू शकतो, त्याच देशात जर दमदाटीचं वातावरण कोणी करत असेल तर त्यांनाही धडा शिकवण्याची ताकद या सामान्य माणसाकडे आहे. ती दाखवल्याशिवाय सामान्य माणूस राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पाऊस ओसरताच भेटीगाठी घेऊ
एका बाजूने पाऊस आणि कडक ऊन आहे. तरीही तुम्ही मोठ्या संख्येने आलात. याचा अर्थ कितीही संकट आलं तरी खानदेशातील कार्यकर्ता या देशाच्या हिताची जपणूक करण्यासाठी मजबूत उभा राहील, असं ते म्हणाले. पाऊस कमी झाला तर आम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन भेटीगाठी घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.