जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होणार?, अजित पवार यांच्या बंगल्यावर खलबतं; पाच समर्थक आमदार पोहोचले
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खलबतं सुरू झाली आहेत. राष्ट्रवादीत पुन्हा एकदा भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे. अजित पवार हे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्यालाही पक्ष संघटनेत काम करण्यासाठी पद देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे अजितदादा यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उचलबांगडी करून अजितदादांकडे हे पद दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी अजित पवार समर्थकांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी सकाळीच अजित पवार यांच्या बंगल्यावर त्यांच्या समर्थक आमदारांनी हजेरी लावली असून हे आमदार अजितदादांशी चर्चा करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आज सकाळीच अजित पवार यांचे समर्थक आमदार धनंजय मुंडे, दौलत दरोडा, हसन मुश्रीफ, किरण लहामाटे, दिलीप वळसेपाटील आणि खासदार अमोल कोल्हे हे अजितदादा यांच्या देवगिरी या निवासस्थानी आले आहेत. या पाचही आमदारांनी सकाळी सकाळीच अजितदादांच्या घरी आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित आहेत. अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद द्यावे म्हणून हे आमदार लॉबिंग करत असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत पक्षातील संघटनात्मक बदलावरही चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजितदादांशी बोलल्यानंतर हे नेते शरद पवार यांचीही भेट घेणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जिल्हाध्यक्षही भेट घेणार
दरम्यान, अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी पक्षातील आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच आता जिल्हाध्यक्षही मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष लवकरच अजितदादा पवार यांची भेट घेणार असल्याचं वृत्त आहे.
जयंत पाटील जाणार की राहणार?
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नाही. मात्र, जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यपदाबाबतच चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार यांनी पक्षात नुकतीच भाकरी फिरवली. त्यात सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार स्वत: पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्षा आहेत. तर अजित पवार हे विरोधी पक्षनेते. एकाच घरात तीन तीन पदं असल्याने अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद शरद पवार देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.