निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, तुतारी चिन्ह गोठवलं; शरद पवार गटात नेमकं काय घडतंय?
निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ आणि ‘तुतारी’ हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राज्य निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह कायम ठेवले आहे. तर निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ आणि ‘तुतारी’ हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रात काय?
जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाने काढलेले पत्र वाचून दाखवले. दि. 30 नोव्हेंबर 2019 च्या अधिसूचनेतील परिशिष्ट 3 मधील अनुक्रमांक 172 वरील ‘बिगुल’ (पिपाणी) आणि अनुक्रमांक 173 वरील ‘तुतारी’ ही मुक्त चिन्ह गोठवण्यात येत आहेत, असे पत्रक राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली.
“ती निवडणूक आयोगाची जबाबदारी” – जयंत पाटील
गेल्या लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस हे आमचे चिन्ह होतं. राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी अशी घोषणा आम्ही केली. पण त्याठिकाणी तुतारी हे चिन्ह होतं. त्यामुळे काहींनी चुकीच्या गोष्टी पसरवल्या आणि आमचं चिन्ह चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात आले. त्यामुळे आमचे नुकसान झाले. दिंडोरी, सातारा या ठिकाणी आम्हाला फटका बसला.
यानंतर आता निवडणूक आयोगाने 16 जुलै रोजी एक आदेश जारी केला आहे. त्यात त्यांनी पिपाणी आणि तुतारी ही दोन स्वतंत्र चिन्ह गोठवण्यात येत असल्याचे म्हटलं आहे. आमच्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. आता भारत निवडणूक आयोग देखील याबाबत योग्य तो निर्णय घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मतांचा गोंधळ होऊ नये, ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी योग्य तो निर्णय घ्यायला हवा, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
लोकसभेवेळी मतदारांमध्ये मोठा संभ्रम
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ‘घड्याळ’ हे चिन्हे अजित पवार गटाला देण्यात आले होते. तर ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला देण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीवेळी काही अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ हे चिन्हे देण्यात आले. ‘तुतारी वाजवणारा माणूस’, ‘पिपाणी’ आणि फक्त ‘तुतारी’ ही चिन्हे जवळपास सारखीच असल्याने ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला.
अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या या चिन्हांचा मोठा फटका राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला होता. यामुळे काही ठिकाणी मतांचे विभाजन झाले. यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे धाव घेत ‘पिपाणी’ या चिन्हावर आक्षेप नोंदवला होता. आता निवडणूक आयोगाने याप्रकरणी निकाल दिला असून ‘पिपाणी’ हे चिन्ह गोठवले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह कायम ठेवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष चिन्हावरच निवडणूक लढणार आहे.