Raosaheb Danve : महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं चॅलेंज नाही, रावसाहेब दानवेंनी इतिहासच सांगितला
Raosaheb Danve : आमचे सर्व जुने वाद मिटल्याचं केसरकरांनी स्पष्ट केलं केलं आहे. आम्ही एकमेकांच्या नावाचा उल्लेख करणार नाही, आम्ही एकमेकांवर टीका करणार नाही, असं केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तुम्ही मागचे वाद सोडून द्या, असंही त्यांनी सांगितलं.
पुणे: लोकसभा निवडणुकीला अजून दोन वर्ष बाकी आहे. पण त्याआधीच भाजपने (bjp) राज्यात मिशन 48 सुरू केलं आहे. राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याबाबतचं सुतोवाच खुद्द भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं (ncp) आम्हाला चॅलेंज नाही, असा दावाही रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला आहे. आम्हाला राज्यात राष्ट्रवादीचं चॅलेंज नाही. राष्ट्रवादीचे आघाडी असताना 6 आणि आघाडी नसताना 4 एवढेच खासदार आतापर्यंत निवडून आल्याचा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी आम्हाला चॅलेंज नाही आणि ते काही आमचं टार्गेट नाहीये, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या निवडणूक मिशनचीही माहिती दिली.
निर्मला सीतारामन बारामतीत जात आहेत. त्यामुळे भाजपचं लक्ष बारामतीवर आहे की काय असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे. पण प्रत्येक नेत्यांनी मतदारसंघात जाणं त्या ठिकाणी सरकारी कार्यक्रम करणं, परिस्थितीचा आढावा घेणं आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणं हा भाजपचा अजेंडा आहे, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
राणे-केसरकर वाद मिटला
भाजप नेते नितेश राणे आणि शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांच्यातील वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमचे सर्व जुने वाद मिटल्याचं केसरकरांनी स्पष्ट केलं केलं आहे. आम्ही एकमेकांच्या नावाचा उल्लेख करणार नाही, आम्ही एकमेकांवर टीका करणार नाही, असं केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तुम्ही मागचे वाद सोडून द्या, असंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात मिशन 48 सुरू
दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील मिशन 48ची माहिती दिली. आमचं महाराष्ट्रात मिशन 48 सुरू झालं आहे. भाजप राज्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याच्या तयारीने काम करत आहे. आम्ही जेव्हा निवडणूक जिंकतो तेव्हाच आम्ही पुढच्या निवडणुकीची तयारी करत असतो, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे भाजप आता महाराष्ट्रात निवडणुकीची जोरदार तयारी करतानाचे चित्रं दिसत आहे.