नीलम गोऱ्हे शिवसेना सोडून चालल्या होत्या, नारायण राणे यांनी बॉम्बच टाकला; कारणही सांगितलं
शिफारशी शिवाय ताई शिवसेनेत राहिल्याच नसत्या. शिवसेना सोडून चालल्या होत्या. मी थांबवलं त्यांना. आठवतं का विचारा त्यांना. मी जे बोलतो ते ऐकल्यावर त्यांना आठवेल.
डोंबिवली: ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे या शिवसेनेत अस्वस्थ होत्या. त्या शिवसेना सोडून निघाल्या होत्या. त्यांना मंत्रिपद मिळत नव्हतं. म्हणून त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या. पण माझ्या शिफारशीमुळे त्या थांबल्या आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. डोंबिवलीत पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी हा मोठा बॉम्ब टाकून एकच खळबळ उडवून दिली आहे.
शिफारशी शिवाय ताई शिवसेनेत राहिल्याच नसत्या. शिवसेना सोडून चालल्या होत्या. मी थांबवलं त्यांना. आठवतं का विचारा त्यांना. मी जे बोलतो ते ऐकल्यावर त्यांना आठवेल. ताई नाराज आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला.
शाहू सावंत आमच्या जवळचे होते. त्यांच्या मुलाने हॉस्पिटल सुरू केलंय. या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी मी आलोय, असं नारायण राणे यांनी सांगितलं. सावरकरांच्या विषयावरून भाजपनं राहुल गांधी यांचा निषेध केलेला आहे. बाळासाहेव ठाकरे हे सावरकरांना का मानत होते हे ना आदित्य ठाकरेंना माहीत आहे, ना उद्धव ठाकरेंना, असा टोला राणे यांनी लगावला.
यावेळी राणेंनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. इतकी वर्ष सत्ता असून आताच यात्रा करावी वाटते. महाविकास आघाडीची ही यात्रा असली तरी त्यात सगळे पक्ष एकत्र आलेले दिसत नाही. हे फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत.
आपले फोटो येतील म्हणून ते यात्रेत गेले आहेत. आदित्य ठाकरेही फोटोसाठीच यात्रेत गेले होते. त्यांना वाटलं या निमित्ताने तरी आपले फोटो छापून येतील, असा टोला लगावतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सगळे खुश आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो, असं ते म्हणाले.
आदित्य ठाकरेंवर मी कधी बोलत नाही. तो बोलतो त्याची दखल घेत नाही. तो बालिश आहे. तो कधी कोणालाही भेटायला जाईल, त्याचा भरवसा नाही, असा चिमटा त्यांनी काढला.