Nitesh Rane : संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना काहीसा दिलासा, 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
यापूर्वी नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या दोन दिवसांत नितेश राणे यांना गोव्यातील राणेंच्या मालकीच्या हॉटेलमध्ये घेऊन जात चौकशी करण्यात आली. आज पुन्हा एकदा नितेश राणे यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता नितेश राणे आणि राकेश परब यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack) प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण, दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज नितेश राणे यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी कणकवली कोर्टानं नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या दोन दिवसांत नितेश राणे यांना गोव्यातील राणेंच्या मालकीच्या हॉटेलमध्ये घेऊन जात चौकशी करण्यात आली. आज पुन्हा एकदा नितेश राणे यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता नितेश राणे आणि राकेश परब (Rakesh Parab)यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोर्टात नेमकं काय घडलं?
नितेश राणेंना कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी 8 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यासाठी सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला होता. नितेश राणे आणि राकेश परब यांच्यासाठी आम्ही युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीची त्यांची मागणी फेटाळली. नितेश राणेंना आता न्यायालयीन कोठडीत घेण्यात आलं आहे. आता पुढील कारवाई होईल. आता लगेच सेशन कोर्टात जामीन अर्ज दाखल केला जाईल. आज लगेच त्यावर सुनावणी होणार नाही. पण पुढील तारीख मिळेल त्यावेळी नितेश राणे यांना जामीन मिळेल, अशी माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिलीय.
‘पुणे तपास आणि आर्थिक बाबींचा संबंध नाही’
आजपर्यंत त्यांना भरपूर वेळ मिळाला आहे. 18 जानेवारीपासून तपास सुरु आहे. नितेश राणे साहेब चार वेळा त्यांच्यासमोर अपील झाले आहेत. बाकी जे काही पुरावे त्यांना घ्यायचे आहेत ते कलेक्ट केले आहेत. त्यात मोबाईल, कागदपत्रांचा समावेश होता. हे सगळं साहेबांनी ऐकल्यानंतर न्यायालयीन कोठडी दिली, असं सतीश माने-शिंदे म्हणाले. पोलिसांना पुण्यात जाऊन तपास करायचा आहे, तसंच काही आर्थिक बाबींचा तपास करायचा आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. पण त्याबाबत कुठलाही पुरावा ते देऊ शकले नाहीत, असंही माने-शिंदे यांनी सांगितलं.
सरकारी वकिलांची मागणी काय?
नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा या गुन्ह्यात आर्थिक व्यवहार झाला का याचा तपास करायचा आहे. नितेश यांना पुण्याला न्यायचं असून अजून काही गोष्टींचा तपास करायचा आहे, त्यामुळे नितेश यांची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी विनंती सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी केली होती.
इतर बातम्या :