Dipak Kesarkar : ईडीच्या भीतीने तुम्ही बंड केलं का?; दीपक केसरकर म्हणतात, 1, 2, 3 आमदार…
Dipak Kesarkar : ईडीच्या कारवाईच्या भीतीने तुम्ही बंड केलंय का? असा सवाल दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. त्यावर, 1,2,3 आमदार ईडीच्या रडारवर असतील. पण बाकीची शेतकऱ्यांची पोरं आहेत.
गुवाहाटी: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 50 आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपची फूस असल्याने शिंदे यांनी बंड केलं, ईडीच्या धसक्याने बंड केलं आणि शिंदे यांच्या अधिकारांना मुख्यमंत्र्यांनी कात्री लावल्याने त्यांनी बंड केले. असे एक ना अनेक तर्कट वर्तवले जात आहेत. या सर्व प्रश्नांना शिंदे समर्थक दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही ईडीच्या भीतीने बंड केलं नाही. फक्त दोनचार लोकांवर ईडीने कारवाई केली आहे. बाकीचे तर शेतकरी आमदार आहेत. त्यांच्यावर कसली आलीय ईडीची कारवाई? असा सवाल करतानाच आम्ही शिवसेनेसोबत आजही आहोत. शिवसेनेसोबतच (Shivsena) राहणार आहोत. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की, भाजपसोबत युती करा. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतून बाहेर पडा, असं दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी सांगितलं. दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
ईडीच्या कारवाईच्या भीतीने तुम्ही बंड केलंय का? असा सवाल दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. त्यावर, 1,2,3 आमदार ईडीच्या रडारवर असतील. पण बाकीची शेतकऱ्यांची पोरं आहेत. शेतकरी आमदार आहेत. त्यांच्यावर ईडीची कारवाई नाहीये. केवळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीची कमतरता झाली, त्यामुळे दरी निर्माण झाली. अशावेळी एकमेव भेटणारा नेता होता शिंदेसाहेब. त्यामुळे त्यांच्याविषयीचं प्रेम वाढलं. त्यामुळं हे झालं, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
तर ओळख परेड करू
आम्ही उद्धव ठाकरेंना सांगत होतो, तुम्ही भाजपसोबत सरकार बनवा. त्यांच्यासोबत निवडणूक लढवली. मग त्यांच्यासोबत सरकार बनवायला काय हरकत आहे?, असं त्यांनी सांगितलं. राज्यपालांसमोर आमदारांची परेड करणार आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. आवश्यकता असेल तर आम्ही परेड करू. आम्ही ते व्हिडीओ काढलेले आहेत. आता सगळं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर सुरु आहे. कोरोनात कसं सगळं सुरु होतं, मग आतापण घ्यावं ना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर, त्यात काय अडचण आहे?, असंही ते म्हणाले.
फडणवीस लगेच काम करायचे
भाजपसोबत होतो तेव्हा उद्धव ठाकरेंना सांगायचो, ते फडणवीसांना सांगायचे, ती कामं लगेच व्हायची. तेव्हा ते कॉऑर्डिनेशन होतं. उद्धव ठाकरेंची ती पत होती. आमचे आमदार त्यावेळी उद्धव ठाकरेंना सगळं सांगायचे. आता तसा संवादही राहिला नाही. त्यामुळे सर्वच आमदारांची अडचण झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आमचा खर्च आम्हीच करतोय
तुमचा खर्च कोण करतंय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. असेही प्रश्न अनेकदा उचलले जातात. आमदारांना चांगला पगार आहे. ते तो खर्च उचलू शकतात. शिंदेसाहेब इथं आम्हाला घेऊन आले, त्यांना त्याचे पैसे द्यावे लागणार आहे. ते पेमेंट आम्ही करुन देऊ. यामागे भाजप नक्कीच नाही. आम्ही भाजपशी बोलतोय, पण त्यामध्ये खर्चाचा काही भाग नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.