Shambhuraj Desai : खाते वाटपावरून कोणीही नाराज नाही, कुणीतरी वावड्या उठवतंय; शुंभराज देसाई यांचा खुलासा
Shambhuraj Desai : सांस्कृतिक मंत्री यांनी हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणणं सक्तीचं केलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. देशप्रेम समोर ठेवून हे वक्तव्य केले आहे. यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचं खाते वाटप झालं आहे. या खातेवाटपात भाजपला (bjp) सर्वाधिक महत्त्वाची खाती मिळाली असून शिंदे गटाला दुय्यम दर्जाची खाती मिळाली आहेत. शिंदे गटातील काही आमदारांनाही (MLA) कमी महत्त्वाची खाती मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. तर काही मंत्र्यांना महत्त्वाची खाती मिळाल्यानेही शिंदे गटात नाराजी होती. मात्र, शिंदे गटाकडून नाराजीची चर्चा वारंवार फेटाळली जात आहे. शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनीही त्यावरून स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही कोणीही नाराज नाही. खाते वाटपावरून तर नाराज नाहीच नाही. कुणी तरी वावड्या उठवत आहेत. त्यात काही तथ्य नाही, असा खुलासा शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांनी केला आहे. आम्ही सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. आमचे सगळे अधिकार त्यांच्याकडे आहेत. 9 मंत्र्यांपैकी कुणी नाराजी बोलून दाखवली का? एक तरी उदाहरण द्याल का? असा सवालच शुंभराज देसाई यांनी केला.
राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्या सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर शुंभराज देसाई यांनी मीडियाशी संवाद साधला. उद्या अधिवेशन आहे. त्यानुसार आज चहापान कार्यक्रम असून सगळ्या विरोधीपक्ष नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. विरोधीपक्ष नेत्यांच्या सूचनांवर लक्ष देऊ. उत्तम काम व्हावं, यासाठी आमचा प्रयत्न आहे, असं शंभुराज देसाई म्हणाले. आम्हाला मंत्रीपदाचा प्रभार मिळून एक दिवस झाला आहे. आम्ही जे प्रश्न आले आहेत त्याचा अभ्यास करू आणि उत्तर देऊ. मी राज्य उत्पादन शुल्क विभागाची बैठक बोलावली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
क्रियेला प्रतिक्रिया असेल
शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांची धमकावण्याची भाषा करणारी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी रात्री ती क्लिप पाहिली. क्रियेला प्रतिक्रिया असेल. कार्यकर्त्यांना आधी कोणीतरी धमकी दिली असेल, त्यामुळे त्यांनी हे विधान केले असावे, असा दावा त्यांनी केला.
अनावधानाने प्रकार घडला असेल
आमदार संतोष बांगर यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. त्यावरही देसाई यांनी सारवासारव केली. निश्चित केलेल्या आहाराचा जेवणात समावेश नव्हता म्हणून ते चिडले. त्यामुळे अनावधानाने हा प्रसंग घडला असावा. सत्ता डोक्यात जाणारे आम्ही नाही, असं ते म्हणाले.
अपघाताची चौकशी सुरू आहे
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांचा अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच तपासाचे आदेश दिले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली आहे. अंगरक्षक आणि चालक यांची देखील चौकशी केली जाईल. त्यानंतर जो निष्कर्ष निघेल. त्यानुसार कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
वंदे मातरमचा निर्णय मुख्यमंत्री घेतील
सांस्कृतिक मंत्री यांनी हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणणं सक्तीचं केलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. देशप्रेम समोर ठेवून हे वक्तव्य केले आहे. यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आमची ऐकी तुटणार नाही
मागील 2 महिन्यांपासुन सामनातून काय वक्तव्य येतं आहेत हे महारष्ट्र पाहत आहे. आमच्यामध्ये दूही निर्माण करणे असा प्रकार सुरू आहे. परंतू आमची एकी कोणी तोडू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला.