विधान परिषदेचा फॉर्म भरताच पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया काय?; आयुष्य संपवणाऱ्या कार्यकर्त्याचा उल्लेख
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं अखेर राज्याच्या राजकारणात कमबॅक झालं आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेल्या आणि मध्यप्रदेशाची जबाबदारी असलेल्या पंकजा मुंडे यांचं राज्याच्या राजकारणात कमबॅक झालं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा राज्यात मोठा पराभव झाला. त्यानंतर भाजपने विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पंकजा मुंडे यांनी उमेदवारीवर प्रतिक्रिया व्यक्त करत समाधान व्यक्त केलं आहे.
पंकजा मुंडे यांनी आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत मला अत्यंत कमी मताने पराभव पत्करावा लागला. आता मला पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकण्याचं ठरवलं आहे. पक्षाने मला संधी दिल्यानंतर मला पक्षासाठी काय योगदान देता येईल यासाठी मी काम करणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. मला संधी दिल्याबद्दल मी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचं आभार मानते, असं त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांनी तसं करायला नको होतं
पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केली होती. त्याचा उल्लेखही पंकजा मुंडे यांनी केला. आज जे मला मिळालंय ते मी माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतेय. आज ते कार्यकर्ते असते तर तेही या आनंदात सहभागी झाले असते. त्यांनी असं करायला नको होतं. आपल्याला अजून खूप काम करायचे आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मला दु;ख वाटणं नैसर्गिक आहे. कारण जनतेने मला खूप प्रेम दिलंय. पण कोणीही नेत्यासाठी जीव देऊ नये, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पाच हजार नारळांचा अभिषेक
दरम्यान, बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थनात नारळ अभिषेक करण्यात आला. नामलगावच्या गणपती मंदिरात पाच हजार नारळांचा अभिषेक करण्यात आला. पंकजा यांचा समर्थक असलेल्या गणेश लांडे याने हा अभिषेक केला आहे. पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी त्यांनी हा अभिषेक केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पंकजा मुंडेंना मंत्रीपद द्या
दरम्यान, पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर त्यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंकजा मुंडे यांचं अभिनंदन केलं आहे. पंकजा मुंडेना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली त्यांचं अभिनंदन. त्यांना मंत्रीपद द्यायला हवं. विधानपरिषदेच्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.