Monsoon Session Live : 8 व्या मिनिटाला गदारोळ, मोदी म्हणाले, महिला, दलित मंत्री झालेले बघवत नाही का?
संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Parliament 2021) आजपासून सुरु झालं आहे. 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Parliament 2021) आजपासून सुरु झालं आहे. 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला नव्या सदस्यांना शपथ देण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नव्या मंत्र्यांचा परिचय देण्यासाठी उभे राहिले. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी सुरु केली. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर अवघ्या 8 मिनिटात विरोधकांनी गोंधळाला सुरु झाली. त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, काही लोकांना महिला, दलित आणि शेतकरी मंत्री झालेले बघवत नाही, त्यामुळेच विरोधक गोंधळ घालत आहेत.
मोदी म्हणाले, ” मला वाटलं आज सभागृहात उत्साहाचं वातावरण असेल. मोठ्या संख्येत महिला, दलित, आदिवासी, शेतकरी कुटुंबातील खासदार आता मंत्री झाल्याने आनंदाचं वातावरण असेल. त्यांचा परिचय करुन देणं आनंदाचं होतं, मात्र काहींना दलित, महिला, ओबीसी, शेतकरी पुत्र मंत्री झालेले रुचले नाही. त्यामुळेच त्यांनी परिचय करु दिला नाही”
Hon’ble PM Shri @narendramodi‘s introductory remarks in Lok Sabha for new ministers. https://t.co/RzEjv8hi7i
— Bhupender Yadav (@byadavbjp) July 19, 2021
कामकाज स्थगित
विरोधकांनी एकच गदारोळ सुरु केल्यामुळे, लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज पहिल्याच दिवशी, पहिल्याच सत्रात दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. तिकडे राज्यसभेचं कामकाजही 12:24 पर्यंत स्थगित करण्यात आलं.
कामकाज सुरु होण्यापूर्वी मोदींची प्रतिक्रिया
आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. कोरोनाची लस घ्या आणि बाहुबली बना, असं आवाहन देशवासियांना करतानाच संसदेत कळीचे प्रश्न विचारा. पण उत्तरं देण्याची सरकारला संधीही द्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केलं.
31 विधेयकं मांडणार
पावसाळी अधिवेशनात 2 आर्थिक विधेयकांसह एकूण 31 विधेयकं मांडली जाणार आहेत. 13 ऑगस्टपर्यंत सभागृहाचं कामकाज नियोजित आहे. काँग्रेस खासदार मनिष तिवारी लोकसभेत कृषी कायद्यांविरोधात स्थगन प्रस्ताव देणार आहेत. शेतकरी आंदोलनावरुन काँग्रेससह विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. मात्र गदारोळात सभागृहाचं कामकाज वाया जाऊ नये, असं आवाहन सत्ताधारी भाजपकडून केलं आहे.
मोदींचं 20 जुलैला कोरोनावर निवदेन
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे 20 जुलैला कोरोनावर निवेदन देणार आहेत. देशातील कोरोनाची सद्यस्थिती, लसीकरण मोहीम, उद्योग धंदे वगैरेवर मोदी सरकारची बाजू मांडतील.
संबंधित बातम्या
लस घ्या, बाहुबली बना; पंतप्रधान म्हणतात, संसदेत प्रश्न विचारा, पण उत्तरं देण्याची संधीही द्या