‘आधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा, मग केंद्राकडे मागणी करा’, चंद्रकांतदादांचं ठाकरे सरकारला आव्हान
'स्वतः काही करायचे नाही आणि प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारने केली पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारचं धोरण आहे'.
मुंबई : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसकडून राज्यभरात आंदोलनं करण्यात आली. त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलंय. सत्ताधारी महाविकास आघाडीनं राज्यातील कर कमी करून पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करावी आणि मग केंद्राकडे तशी मागणी करावी, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. ते सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (Chandrakant Patil criticizes Thackeray government over fuel price hike)
स्वतः काही करायचे नाही आणि प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारने केली पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारचं धोरण आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी होण्यासाठी केंद्र सरकारनेच उपाय करावेत, अशी राज्यातील सत्ताधाऱ्यांची अपेक्षा आहे. पेट्रोल डिझेलच्या बाबतीत आयातीचा दर, प्रक्रियेचा खर्च, वाहतूक खर्च आणि वितरकांचे कमिशन यामध्ये बदल होऊ शकत नाही. त्यावरील करांमध्ये फक्त बदल होऊ शकतो. अन्य राज्यांनी कर कमी केले, त्यामुळे तिथे शंभरच्या आत दर आहेत. महाविकास आघाडी सरकारनंही महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलवरील राज्य सरकारचा कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा. या सरकारने स्वतः कर कमी करून मग केंद्राला आवाहन केले तर त्याला अर्थ आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
अजितदादा आणि उद्धवजी यांचे म्हणणे असे आहे की जनतेच्या भल्यासाठी जे जे करायचे असेल ते केंद्रानेच कमी करावे, आम्ही काहीच करणार नाही ;असे चालणार नाही. पेट्रोलचे भाव आटोक्यात आणण्यासाठी इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही त्यावरील कर कमी करावा. pic.twitter.com/qRhuqtwJsP
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 7, 2021
ठाकरे सरकारमध्ये कामय गोंधळ- पाटील
त्याचबरोबर कोरोना, मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, अनुसूचित जाती – जमातींचे पदोन्नतीमधील आरक्षण यावरुनही पाटील यांनी ठाकरे सरकारला टोला हाणलाय. वरील प्रत्येक बाबतीत उद्धव ठाकरे सरकारमध्ये गोंधळ असतो. तसाच प्रकार कोरोनाविषयी निर्बंधांबाबत होत आहे. या सरकारने सर्वांशी विचार विनिमय करून निश्चित दिशा ठरविण्याची गरज असल्याचं पाटील म्हणाले. तसंच संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्षाची भूमिका स्वीकारली आहे. त्यांच्या भूमिकेला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे. मराठा समाजाचे प्रश्न सुटण्यासाठी पक्ष राजेंना पूर्ण ताकदीने पाठबळ देईल, असा पुनरुच्चारही पाटील यांनी केलाय.
छत्रपती संभाजीराजे यांचे नेतृत्व आम्हाला मान्यच आहे कारण ते आमचे राजे आहेत, भाजपाचे नेते आहेत. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्याच्या त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागतच करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनांमध्ये आम्ही सहभागी होणारच आहोत. pic.twitter.com/klq8W1xFgl
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 7, 2021
‘महिनाअखेर चांगल्या प्रमाणात लस उपलब्ध होईल’
भाजपाच्या एका सदस्याने पुण्यात पीएमपीएलच्या संचालकपदाचा राजीनामा देण्यावरून निर्माण झालेला तांत्रिक पेच सुटला आहे. भाजपाच्या एका पक्षांतर्गत बाबीचे भांडवल करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं, असंही पाटील म्हणाले. कोरोनाच्या लशीच्या उत्पादनाची स्थिती सुधारत आहे. महिनाअखेर चांगल्या प्रमाणात लस सर्वत्र उपलब्ध होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केलाय.
संबंधित बातम्या :
भाजपमध्ये अस्वस्थता नाही, नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं; चंद्रकांत पाटलांचा टोला
संभाजीराजे छत्रपतींचं नेतृत्व मान्यच, त्यांच्या आंदोलनात भाजप सहभागी होणार, चंद्रकांत पाटलांची घोषणा
Chandrakant Patil criticizes Thackeray government over fuel price hike