मी अजून दारूला स्पर्शही केलेला नाही!; पहिल्या धारेची किक अन् खंबा, अजित पवार यांची तुफान फटकेबाजी
Maharashtra DCM Ajit Pawar on Wine and Grapes : द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांसमोर अजित पवार यांची तुफान फटकेबाजी; म्हणाले, मी अजून दारूला स्पर्शही केला नाही... शरद पवार यांच्यावर काय म्हणाले अजित पवार? द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी बोलताना दिली कौतुकाची थाप, वाचा...
पिंपरी चिंचवड | 29 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ यांच्या वतीनं 63 व्या द्राक्ष परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेचा समारोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाने झाला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. मी अजून दारूला स्पर्शही केलेला नाही!, असं अजित पवार म्हणाले अन् एकच हशा पिकला. दरम्यान या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ पुणे द्राक्ष परिषद अंतर्गत 63 व्या वार्षिक मेळाव्याच्या उद्घाटनाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता अजित पवार याच्या भाषणाने झाली.
देशी दारूच्या दुकानांना वाईन्स म्हटलं जातं. त्यामुळं काही घटकांचा असा विचार झाला की हे सरकार आणखी वाईन्सची दुकानं टाकतंय. मुळात ती वाईन्सची दुकानं आणि द्राक्षपासून निर्माण केली जाणारी वाईन यात फरक आहे. हे तुम्ही जाणून आहात. काही देशांत तर पाण्याऐवजी वाईन्स पितात. कुणाला पहिल्या धारेची किक बसते तर कुणाला अख्खा खंबा लागतो. पण मी अजून दारूला स्पर्शही केलेला नाही, असं अजित पवार म्हणाले.
मी अर्थमंत्री अन उपमुख्यमंत्री असल्यानं तुम्ही मला आज मोठेपण दिलं. आता तुम्ही अजित पवारला आज बोलावलं, का बोलावलं? कारण अजित पवारकडे अर्थ खातं आहे. उपमुख्यमंत्री पद आहे. त्याच्याकडून आपलं काम होईल, म्हणून त्याला मोठेपण दिलं. त्याला ही वाटेल द्राक्ष बागायतदार आपल्याला विसरला नाही. तुमच्या जागी मी असतो तर हेच केलं असतं, असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
शरद पवारांनीही या द्राक्ष परिषदेला हजेरी लावली होती. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदरणीय शरद पवारसाहेब नेहमीच तुमच्या मदतीला धावले. ते कृषिमंत्री असल्यापासून शेतकऱ्यांच्या मदतीला येतात. म्हणूनच या परिषदेच्या शुभारंभाला शरद पवारसाहेब आले होते. आज समारोपाला अजित पवार आलेत. आता सगळे म्हणतील काय पवार-पवार चालवलंय. मुळातच तुमच्या द्राक्ष बागायतदार संघाचे चेअरमनचं शिवाजी पवारच आहेत! आता सगळेच पवार म्हटल्यावर पवारांचं चाललंय काय? अशी चर्चा रंगणार, असं म्हणत अजित पवार यांनी टोलेबाजी केली. अजित पवार यांनी काल पिंपरीत केलेल्या या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सगळ्यात जास्त कष्ट घेणारा शेतकरी म्हणजे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण पीक आल्यापासून ग्राहकाच्या घरात द्राक्ष जाण्यापर्यंत शेतकऱ्याला काळजी घ्यावी लागते. नेहमी नसर्गिक संकटाना शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. सध्या पण पाऊस नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मात्र आम्ही त्यात काही तरी मार्ग काढू, असंही अजित पवार म्हणाले.