काँग्रेस परजीवी पार्टी, ज्याच्यासोबत आघाडी करते त्यालाच… मोदींकडून आकडेवारी देत पोलखोल
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. आम्ही तिसऱ्यांदा निवडून आलो आहोत. आमच्या तिसऱ्या टर्मचा अर्थ आम्ही तीनपट सक्रिय राहणार आहोत. आमच्या तिसऱ्या टर्मचा अर्थ आम्ही तीनपट लोकसभेत यश मिळवू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना मोदींनी काँग्रेसचा पर्दाफाश केला. एवढेच नव्हे तर काँग्रेस ही परजीवी आहे. काँग्रेस ज्यांच्यासोबत आघाडी करते, त्यांच्याच मतांवर डल्ला मारते, असा दावाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. काँग्रेस हा बालकबुद्धी असलेल्यांचा पक्ष आहे. त्यांना व्यवहार ज्ञान नाही. ते लोकमतांचा कौल स्वीकारत नाहीये. तसेच भाजपला पराभूत केल्याचा खोटा नरेटिव्ह पसरवण्यात मश्गुल आहे, अशी खरपूस टीकाच मोदींनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं विश्लेषण करत जोरदार हल्लाबोल केला. 13 राज्यात आमच्या शून्य जागा आल्या असं काँग्रेस सांगत आहे. अरे शून्य जागा आल्या पण हिरो तर आम्हीच ना? आम्ही पक्ष तर बुडवला नाही ना? काँग्रेसच्या लोकांना सांगतो, लोकमताच्या खोट्या विजयाच्या उत्सवात राहू नका. इमानदारीने देशाचा कौल समजून घ्या. तो स्वीकार करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
त्यांच्याच पक्षावर डल्ला
आता काँग्रेस पक्ष 2024 पासून परजीवी काँग्रेस पार्टी म्हणून ओळखली जाणार आहे. ज्या शरीरासोबत हा परजीवी राहतो, तो त्या शरीरालाच खातो. काँग्रेस सुद्धा ज्या पक्षासोबत युती करते त्यांचेच मते खाते. आणि मित्र पक्षाच्या मतांवर वाढते. त्यामुळे काँग्रेस परजीवी काँग्रेस बनली आहे. मी जेव्हा परजीवी म्हणतो तेव्हा ते तथ्यांच्या आधारेच म्हणतो. त्यासाठी मी काही आकडे देतो, असं मोदी म्हणाले.
स्ट्राईक रेट वाढला
जिथे जिथे भाजपा आणि काँग्रेसचा थेट मुकाबला होता, किंवा जिथे काँग्रेस मेजर पार्टी होती, तिथे काँग्रेसचा स्ट्राईक रेट केवळ आणि केवळ 26 टक्के आहे. परंतु, जिथे कुणासोबत तरी काँग्रेसने आघाडी केली. ज्युनिअर पार्टी म्हणून राहिली, अशा राज्यात काँग्रेसचा स्ट्राईक रेट 50 टक्के आहे. आणि काँग्रेसच्या 99 मधील अधिक जागा त्यांच्या मित्र पक्षांनी जिंकून दिल्या आहेत. म्हणूनच काँग्रेस परजीवी आहे, असा हल्ला मोदींनी केला.
तेवढ्या जागाही मिळाल्या नसत्या
16 राज्यात काँग्रेस स्वबळावर लढली. तिथे त्यांचा व्होट शेअर कमी झालाय. गुजरात, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यात काँग्रेस स्वबळावर लढली, या राज्यातील 64 जागांपैकी फक्त दोन जागा काँग्रेस जिंकली. याचाच अर्थ या निवडणुकीत काँग्रेस पूर्णपणे परजीवी बनली. तसेच आपल्या मित्र पक्षाच्या खांद्यावर चढून जागांचा आकडा वाढवल्या आहेत. काँग्रेसने मित्र पक्षांची मते खाल्ली नसती तर काँग्रेसला लोकसभेत एवढ्या जागा जिंकणंही मुश्किल होतं, असा दावाही त्यांनी केला.