Prakash Ambedkar on Nupur Sharma: ‘सुप्रीम कोर्टाचा निर्णय आंतरराष्ट्रीय राजकारणसाठी हानिकारक’ प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
Nupur Sharma: प्रकाश आंबेडकर म्हणाले," कोर्टाने नुपुर शर्मा यांना निर्देश दिलेत, की त्यांनी देशाची माफी मागावी. दुर्दैवानं त्यात एक गोष्ट राहिलीये.
नवी दिल्ली: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (BJP Nupur Sharma) यांना सुप्रीम कोर्टाने पैगंबर यांच्यावर केलेल्या टिप्पणी प्रकरणी जोरदार फाटकारलंय. सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माला संपूर्ण देशाची माफी मागण्यास सांगितलीये. यासोबतच खटला दाखल करण्याची याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलंय.”सुप्रीम कोर्ट काही वेळेस चांगल्या उद्देशान निर्देश देतं” असं त्यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)म्हणाले,” कोर्टाने नुपुर शर्मा यांना निर्देश दिलेत, की त्यांनी देशाची माफी मागावी. दुर्दैवानं त्यात एक गोष्ट राहिलीये. माफी मागायला सांगितलीय हा निर्णय शांतता अबाधित ठेवण्यासाठी योग्य असला तरी आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी माञ हानिकारक आहे कारण त्यातून देशाबाहेर वेगळा मेसेज जातोय.”
आता हा जागतिक विषय झालाय- प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, “हे मुसलमानांच्या विरोधातलं षडयंत्र आहे असं नाही, तर आता हा जागतिक विषय झालाय. जगाचं लक्ष आता याकडे आहे. वेगवेगळ्या धर्माचे प्रेषित आहेत, त्याचा तुम्ही आदर करता की नाही, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जे लोकं आदर करत नाही, त्यावर तुम्ही काय काम करता, हे पाहणं महत्त्वाचंय.आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाचा निर्णय हानीकारक आहे.” नुपूर शर्मा यांनी पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. नुपूरच्या बदलीच्या अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने म्हटले की, तिच्या वक्तव्यामुळे देशभरातील लोकांच्या भावना भडकल्या आहेत. आज देशात जे काही घडत आहे त्याला ते वक्तव्य जबाबदार आहे. कोर्टाने नुपूर शर्माला देशाची माफी मागायला सांगितली. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या याच निकालावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आपलं मत मांडलंय.
भाजपने पक्षातून निलंबित केले
नुपूर शर्मा या भाजपच्या प्रवक्त्या आहेत. अलीकडेच त्यांनी एका टीव्ही चर्चेत मोहम्मद पैगंबर यांच्यावर टीका केली होती. याला मोठा विरोध झाला. कुवेत, यूएई, कतारसह सर्व मुस्लिम देशांनीही त्यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. मात्र, त्यांनी आपल्या टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. मी माझे शब्द मागे घेते असेही त्यांनी सांगितले. कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. असंही नुपूर शर्मा म्हणाल्यात.
देशातील अनेक भागात निदर्शने
नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर देशातील अनेक भागात निदर्शने झाली. एवढेच नाही तर महाराष्ट्रासह अनेक राज्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याचवेळी नुपूर शर्मा यांनी सर्व प्रकरणे दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जावे. त्यांनी याचिका मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.