Prakash Ambedkar : काँग्रेस पक्ष अक्कलशून्य झालाय, आता काँग्रेस, राष्ट्रवादीला दुय्यम स्थान द्या, आंबेडकरांचं विरोधकांना आवाहन
Prakash Ambedkar : माझ्याकडे एकही मतं नाही. मात्र द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा मिळेल. कारण 70 वर्षानंतर आदिवासी देशाचा राष्ट्रपती होतोय. त्यामुळे त्यांना सर्वांनीच पाठिंबा द्यायला हवा, असं सांगतानाच काँग्रेसने आदिवासी उमेदवार द्यायला हवा होता, असं मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
पुणे: काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादी (ncp) हा भाजपला पर्याय होऊ शकत नाही. 2024 च्या निवडणुकीत आघाडी करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दुय्यम स्थान द्या. तरचं भाजपला आपण हरवू शकतो. ममता बँनर्जी, नवीन पटनाईक, चंद्रशेखर राव, स्टॅलिन यांनीही त्याचा विचार करावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी केलं आहे. काँग्रेसचं आतापर्यंतचं राजकारण दिवाळखोरीचं राहिलं आहे. अक्कलशून्य असा काँग्रेस पक्ष झाला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहांसमोर पक्ष झोपला आहे, असा घणाघाती हल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी केला. आंबेडकर यांनी केलेल्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत. यापूर्वी आंबेडकरांनी काँग्रेसला अनेकवेळा आघाडीचं आवाहन केलं होतं. पण काँग्रेसनेही त्याला प्रतिसाद दिला होता. मात्र, काँग्रेसने प्रत्यक्षात कोणतीही पावले उचलली नव्हती. त्यापार्श्वभूमीवर आंबेडकर यांच्या या विधानाला महत्त्व आलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी टिव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी आंबेडकर यांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. माझ्याकडे एकही मतं नाही. मात्र द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा मिळेल. कारण 70 वर्षानंतर आदिवासी देशाचा राष्ट्रपती होतोय. त्यामुळे त्यांना सर्वांनीच पाठिंबा द्यायला हवा, असं सांगतानाच काँग्रेसने आदिवासी उमेदवार द्यायला हवा होता, असं मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
काँग्रेसकडे दानत नाही
राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा आदिवासी असावा, असं मी आधीच विरोधकांना कळवलं होतं. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. काँग्रेसने अक्कलशून्य कारभार केला. भाजपने आदिवासी उमेदवार दिला. तो आपल्याला देता आला नाही. हे मान्य करायला हवं होतं. पण तेवढी दानत काँग्रेसकडे नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
उद्या मत मांडणार
राज्यात सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचंच सरकार आहे. हे दोनच नेते कॅबिनेटची बैठक घेऊन निर्णय घेत आहेत. त्यावर शिवसेनेने आणि काही विचारवंतांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत आंबेडकर यांना विचारले असता राज्यातील परिस्थितीवर उद्या मी माझं मत मांडे, असं ते म्हणाले.
सिन्हांनी माघार घ्यावी
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी संपुआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याचं आवाहन केलं होतं. अनुसूचित जातीचे आणि जमातीचे अनेक खासदार पक्षाच्या पलिकडे जाऊन द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे सिन्हा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यायला हवी, असं आवाहन त्यांनी केलं होतं.