हास्यजत्रेच्या प्रसाद खांडेकरच्या चित्रपटाचा मुद्दा अधिवेशनात; फडणवीसांकडून कारवाईचे आदेश
हिंदी चित्रपटांच्या मक्तेदारीमुळे महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नसल्याची तक्रार याआधीही अनेकदा करण्यात आली. आता थेट हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडण्यात आला. प्रवीण दरेकरांनी प्रसाद खांडेकरच्या 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याचा प्रश्न मांडला.
नागपूर : 7 डिसेंबर 2023 | हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज विधानपरिषदेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मराठी चित्रपटाला थिएटर उपलब्ध करून दिलं जात नसल्याबद्धल प्रश्न उपस्थित केला. बोरिवलीतील हास्य कलाकार आणि मराठी दिग्दर्शक-अभिनेता प्रसाद खांडेकरच्या नवीन मराठी चित्रपटाला थिएटर उपलब्ध करून दिलं जात नसल्याचं त्यांनी म्हटलं. मराठी चित्रपटांच्या होणाऱ्या या गळचेपीबाबत राज्य शासनाने लक्ष घालून सहकार्य करावं अशी मागणीही त्यांनी केली. त्याला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिलं.
विधानपरिषदेत बोलताना आमदार प्रविण दरेकर म्हणाले, “मागाठाणे विधानसभा क्षेत्रात बोरीवली कुलूपवाडी इथं राहणारा एक हुशार होतकरू हास्य कलाकार, मराठी तरुण अभिनेता प्रसाद खांडेकर यांचा उद्या 8 डिसेंबर रोजी ‘एकदा येऊन तर बघा’ हा मराठी चित्रपट प्रसिद्ध होत आहे. पण हिंदी चित्रपटांच्या मनमानीमुळे खांडेकर यांच्या चित्रपटाला थिएटर मिळत नाही. एक मराठी होतकरू तरुण कलाकार-दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा मराठी सिनेमा घेऊन येत आहे. पण त्याला सिनेमागृह मिळत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यात लक्ष घालून सहकार्य करावं.”
View this post on Instagram
दरेकर यांच्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “प्रसाद खांडेकर हे अत्यंत गुणी कलावंत आहेत. हास्यजत्रेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सातत्याने त्यांनी लोकांच्या मनावर प्रचंड पगडा निर्माण केला आहे. अशा मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. पण ते थिएटर उपलब्ध करून दिले जाईल.”
प्रसाद खांडेकरच्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात बरेच विनोदी कलाकार झळकणार आहेत. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, नम्रता संभेराव, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, वनिता खरात, रोहित माने अशी कलाकारांची मोठी फौजच यामध्ये पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकरांनीच केलं आहे.