Pravin Darekar : ‘बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांना केवळ सत्तेसाठी मूठमाती देऊ नका’, प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंना जोरदार टोला
राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देणं आधीच आवश्यक होतं. मुद्दाम उशीर करण्याचं काम सुरु आहे. परवानगी द्या अथवा नका देऊ त्यांचं काम सुरु आहे. त्यांची सभा होणारच, प्रत्येक सभा होण्याआधी जातीय तेढ निर्माण होणार नाही या अटीशर्थी असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्या सभेवर निर्बंध टाकले तरी राज ठाकरे एका चौकटीत बोलतील असं वाटत नाही, असं दरेकर म्हणाले.
पुणे : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रान पेटवलं आहे. त्यानंतर आता 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत सभा घेणार असल्याचंही राज ठाकरे यांनी जाहीर केलंय. त्यासाठी मनसेकडून जंगी तयारी सुरु आहे. मात्र, अद्याप सभेला परवानगी मिळालेली नाही. अशावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका केलीय. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देणं आधीच आवश्यक होतं. मुद्दाम उशीर करण्याचं काम सुरु आहे. परवानगी द्या अथवा नका देऊ त्यांचं काम सुरु आहे. त्यांची सभा होणारच, प्रत्येक सभा होण्याआधी जातीय तेढ निर्माण होणार नाही या अटीशर्थी असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्या सभेवर निर्बंध टाकले तरी राज ठाकरे एका चौकटीत बोलतील असं वाटत नाही, असं दरेकर म्हणाले.
भोंग्याच्या मुद्द्यावरुनही दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांना केवळ सत्तेसाठी मूठमाती देऊ नका. मुख्यमंत्र्यांना भोंग्याच्या संदर्भात निर्णय घेण्याची संधी मिळाली होती, परंतु सत्तेच्या साठमारीत ते निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणून राज ठाकरे यांनी राज्य सरकारला भोगी सरकार अशी जी उपमा दिली आहे ती योग्य आहे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.
सर्व पक्षांच्या सभांचा सिलसिला सुरु झालाय
उद्धव ठाकरे यांच्याही सभाचा सिलसिला सुरू झालाय. देवेंद्र फडणवीस यांचीही मुंबईत सभा आहे. महाविकास आघाडीची देखील सभा होणार आहे. सभेच्या माध्यमातून पक्षाचे विचार, एकमेकांवरील आरोप, टीकाटिप्पणी आणि त्यावरील उत्तर द्यायचं काम पक्षाचे नेते करत असतात. मग जनता ठरवते की कुठला पक्ष कोणती भूमिका मांडतो आणि नेत्यांची विचारधारा काय, असंही दरेकर म्हणाले.
‘शिवसेना नेत्यांवर कारवाई का नाही?’
अलीकडच्या काळात शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर, आमदारांवर बलात्काराचे आरोप झाले. मात्र, कुठलीही कारवाई झाली नाही. कुचिक, बोरनाळे यांच्यावर आरोप झाले, मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने आत्महत्या केली, हे उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. आपला तो बाब्या इतरांचं कारटं असं होता कामा नये. शिवसेनेच्या नेत्यांकडून महिलांबाबत अशीच कृत्ये होत असतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्ष न बघता कारवाई करणं गरजेचं असल्याचं दरेकर यांनी म्हटलंय.
‘राणा दाम्पत्याचा सूड भावनेतून छळ सुरु’
राणा दाम्पत्यावरील कारवाईवरुनही दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. सरकार सूड भावनेनं पेटलेलं आह. भाजप नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर जोर जबरदस्तीने गुन्हे दाखल केले जात आहेत. अटक करण्यासारखा गुन्हा नसतानाही अटक केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून राणा दाम्पत्यावर सरकार आसूड ओढत आहे. सरकारचे भ्रष्टाचार, गैरव्यवहार बाहेर काढले जात आहे. टीका सहन होत नसल्यानं त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. जो आमच्या विरोधात बोलेल, टीका करेल त्याला त्या ठिकाणी दाबून, चिरडून टाकणार, याच भूमिकेतून राणा दाम्पत्याचा छळ सुरु असल्याचा आरोप दरेकर यांनी केलाय.