वादळ 4 तास थांबलं, मुख्यमंत्री 3 तासही थांबले नाहीत, प्रवीण दरेकरांची खोचक टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील शाब्दिक चकमक अजूनही सुरूच आहे. (pravin darekar slams cm uddhav thackeray's cyclone-hit konkan visit)
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील शाब्दिक चकमक अजूनही सुरूच आहे. कोकणात वादळ चार तास थांबलं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन तासही थांबले नाहीत, अशा शब्दाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. (pravin darekar slams cm uddhav thackeray’s cyclone-hit konkan visit)
तौक्ते वादळाचा पालघर जिल्ह्यालाही मोठा फटका बसला. या वादळामुळे अनेकांचं नुकसान झालं आहे. भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांच्या पुढाकाराने पत्रे, ब्लँकेट, बल्ब आणि विविध उपयोगी साहित्याचा ट्रक पालघरला पाठविण्यात आला आहे. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते या ट्रकला हिरवा कंदिल दाखवण्यात आला. यावेळी त्यांनी ही टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा तीन दिवस 700 किलोमीटरचा दौरा केला. अनेक गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त लोकांची भेट घेतली. मच्छिमारांशी, बगायतदारांशी संवाद साधला. त्यांच दु:ख समजून घेत मदतीचा विश्वासही आम्ही त्यांना दिला. परंतु राज्याचे मुख्यमंत्री तीन तास सुद्धा कोकणात फिरू शकले नाहीत. यावरून सरकारच्या जनतेबाबत, कोकणवासीयांबाबत काय संवेदना आहेत हे दिसून येतं. तसेच वादळापेक्षा जास्त वेग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. वादळ 4 तास थांबले होते. परंतु मुख्यमंत्री केवळ 3 तास सुद्धा थांबू शकले नाहीत, हे राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.
आठ दिवस झाले तरी पंचनामे नाही
मुख्यमंत्र्यांचा दौरा हा केवळ कोकणवासीयांच्या डोळ्यात धूळफेक करणारा होता. मुख्यमंत्र्यांनी दौरा केला नसता तरी चाललं असतं. कोकणात दौरा करून पुन्हा मुंबईत येण्यापेक्षा मंत्रालयात किंवा वर्षा निवास येथे देखील बैठक घेतली असती तरी कोकणवासीयांना दिलासा देता आला असता. त्यांच्या सगळ्या मंत्र्यांनी तात्काळ पंचनामे होतील, असं सांगितलं. मात्र आठवडा उलटून गेला तरी देखील पंचनामे झाले नाहीत. मुख्यमंत्री पंचनामे झाल्यावर मदत जाहीर करू असे सांगतात. पंचनाम्याच्या नावाने कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारने केलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
जमिनीला पाय लावण्यासाठी कोकणात गेले होत का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हवाई प्रवास करतात आणि आम्ही जमिनीवरून दौरा करतो, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. मुख्यमंत्री स्वत: खासगी विमान घेऊन रत्नागिरीला आले होते. त्यांनी विमानतळावरचं बैठक घेतली. नुकसानग्रस्त लोकांची भेट घेणं तर लांबच परंतु त्यांनी कलेक्टर ऑफिसला जाऊन माहिती सुद्धा घेतली नाही. सर्व अधिकाऱ्याना विमानतळावर बोलावून बैठक घेतली. बैठक झाल्यावर चिपी विमानतळावर गेले. अधिकाऱ्यांना बोलवले आणि हेलिकॉप्टरने परत मुंबईला आले. स्वतः विमानाने दौरा करायचा आणि पंतप्रधानांच्या हवाई दौऱ्यावर टीका करायची ही कोणती पद्धत आहे?, असा सवाल करतानाच मुख्यमंत्री जमिनीला पाय लावण्यासाठी कोकणात गेले होत का?, असा खोचक सवालही त्यांनी केला.
जनतेच्या डोळ्यात धूळफेक
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फोटो काढण्यासाठी कोकणचा दौरा करतात या मुख्यमंत्र्यांच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. तुम्ही कोकणात येऊन एका फोटोससाठी तीन दिवस शासनाची यंत्रणा कामाला का लावली? मुख्यमंत्री कोकणात येणार म्हणून येथील सर्व अधिकारी-कर्मचारी तीन चार दिवस कामावर होते. तुम्ही जर एका फोटोसाठी कोकणात आला नसता तर त्या 3-4 दिवसांत अधिकाऱ्यांनी कोकणवासीयांना काहीतरी दिलासा दिला असता, असा टोलाही त्यांनी लगावला.
सरकारमध्ये एकवाक्यता नाही
एका बाजूला कोरणा रुग्ण संख्येत वाढ होत आहे. मृत्यूदर कमी होत नाही. मात्र दुसर्या बाजूला लॉकडाऊन वाढवणार आहोत, असं भीतीचे वातावरण मंत्र्यांकडून निर्माण केले जात आहे. लॉकडाऊनबाबत सरकारमध्येच एकमत नसल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर होणे आवश्यक आहे. जिथे कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे तिथे लॉकडाऊन करायला हवा, असंही ते म्हणाले. (pravin darekar slams cm uddhav thackeray’s cyclone-hit konkan visit)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 23 May 2021 https://t.co/Lo5Cp6VFsA #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 23, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपी बंद करा; नवाब मलिक कडाडले
आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय, संजय राऊतांची भाजपवर जळजळीत टीका
(pravin darekar slams cm uddhav thackeray’s cyclone-hit konkan visit)