राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी भाजपतर्फे देशव्यापी मोहीम, सर्वपक्षांना मतांसाठी विनंती, व्यवस्थापन समितीवर विनोद तावडे, भारती पवारांचा समावेश
येत्या 18 जुलै रोजी देशात राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. यासाठी 29 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने तयार केलेल्या व्यवस्थापन समितीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश आहे.
मुंबईः राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला (Presidential Election) उभे राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नकार दिल्यानंतर आता सत्ताधारी भाजपतर्फे कोणता उमेदवार उभा केला जातो, याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी विरोधकांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे, तसेच भाजकडूनही हालचालींना वेग आला आहे. देशात सर्वोच्च पदाच्या निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येईल. यासाठी भाजपतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. 14 सदस्यांच्या या समितीत भाजपने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार समितीत मोठी जबाबदारी दिली आहे. या संपूर्ण समितीवर निवडणुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
व्यवस्थापन समितीवर कोण-कोण?
BJP includes Union Ministers Gajendra Singh Shekhawat, G Kishan Reddy, Ashwini Vaishnaw, Sarbananda Sonowal, Arjun Ram Meghwal, & Bharati Pawar, in the management team for the upcoming Presidential elections. pic.twitter.com/6b7hwRkx1u
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) June 17, 2022
येत्या 18 जुलै रोजी देशात राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. यासाठी 29 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने तयार केलेल्या व्यवस्थापन समितीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश आहे. तावडे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रावी यांच्यावर सहनिमंत्रकाची जबाबदारी आहे. तर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत हे या टीमचे अध्यक्ष असतील. सर्व मित्रपक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर सोपवली आहे. राष्ट्रपती पदासाठी सर्वानुमते योग्य उमेदवार देण्यासंदर्भात राजनाथ सिंह चाचपणी करत आहे. भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये रणनिती आखण्यात येत आहे. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी सुरु असताना एकमताने उमेदवार निवडीसाठी विरोधी पक्षनेत्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. या समितीत केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, अश्विनी वैष्णव, सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय राज्यमंत्री अर्जून राम मेघवाल, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी राव, तरुण चुघ, राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. के. अरुणा, राष्ट्रीय सचिव ऋतुराज सिन्हा, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नवती श्रीनिवास यांच्यासह राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि आसामचे उपाध्यक्ष खासदार राजदीप रॉय यांचाही समावेश आहे.
देशव्यापी मोहीम हाती घेणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या या व्यवस्थापन समितीतर्फे एक देशव्यापी मोहीम हाती घेतली जाईल. याद्वारे मतदारांना एनडीएच्या उमेदवारासाठी मतदान करण्याची विनंती केली जाईल. पक्षाचा पुरस्कृत उमेदवार निवडून येण्यासाठी यंदा भाजपाला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्ष अध्यक्ष जे पी नड्डा यांनी अनेक राजकीय पक्ष नेत्यांसोबत फोनवरून संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनाही या नेत्यांचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. तथापि, काँग्रेस, तृणमूल, सपा आदींनी भाजपचा उमेदवार नेमका कोण आहे, त्याचे नाव समोर आल्याशिवाय कोणतेही आश्वासन देण्यास नकार दिला आहे.