तेव्हा तुम्ही काय करत होता?; राधाकृष्ण विखे पाटील यांनी का केला शरद पवार यांना सवाल?
सरकार शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्यासाठी एक एक पाऊल टाकत आहे. त्याच त्यांना दुःख होत आहे. त्या रकमा जुन्या होत्या, मग तुमच्या काळात का नाही माफ केल्या?
अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी भूविकास बँकेवरून केलेली टीका सत्ताधाऱ्यांना चांगलीच झोंबली आहे. पवारांच्या या टीकेवर थेट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांनी टीका केली आहे. विकास बँकेचा बोझा अद्यापही शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर आहे. आता ते शंभर टक्के माफ झाले असून लोक त्यातून मोकळे झाले आहेत. शेतकरी (farmer) कायमच परावलंबी राहिल्याशिवाय नेत्याचे महत्त्व वाढत नाही असं राजकारण अनेक वर्षापासून त्यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांना दुःख होणे स्वाभाविक आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर त्यांचं नाव न घेता केली.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी पवारांवर जोरदार हल्ला चढवला. सरकार शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्यासाठी एक एक पाऊल टाकत आहे. त्याच त्यांना दुःख होत आहे. त्या रकमा जुन्या होत्या, मग तुमच्या काळात का नाही माफ केल्या? सरकार तुमचं होतं तेव्हा तुम्ही काय करत होता? असा सवाल करतानाच त्यांनी विधान करताना पूर्ण माहिती घेणे आवश्यक होतं, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांना लगावला.
यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका केली. राज्य सरकार बरखास्त केलं पाहिजे या मागणीसाठी नाना पटोले राज्यपालांना भेटणार आहेत. त्यावर विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नाना पटोले अशा घोषणा करत राहतात. त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेऊन कार्यकारिणीच बरखास्त केली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.
लोकांचं जनमत सरकार बरोबर आहे. पण त्यांचे नेते भारत जोडो यात्रेला निघाले आहेत. मात्र भारत जोडो नंतर लोकांनी काँग्रेस छोडो केलेला आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं. या संदर्भात प्रशासन कार्यवाही करत असून अनेक ठिकाणी ई-पंचनामे आणि पीकपाहणी केली जात आहे. ज्या भागात नुकसान झालं आहे, त्या ठिकाणी शंभर टक्के पंचनामे झाले पाहिजे अशा सूचना मी दिल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
आनंदाचा शिधा हा सरकारचा पहिलाच प्रयोग होता. मोदींनी अडीच वर्ष मोफत धान्य दिलं. तर महाविकास आघाडीचे नेते आमच्यावर टीका करत आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर माफ करा म्हटलं तेव्हा त्यांनी दारूचे दर माफ केले. अशी अवस्था मागच्या सरकारची होती. आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुमचं काही दायित्व आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला.