55 तास काय? 5 वर्ष आमची चौकशी करा, मला काहीच फरक पडत नाही; राहुल गांधींनी भाजपला ललकारले
देशात द्वेष निर्माण व्हावा म्हणून सरकार देशात भीतीचं वातावरण निर्माण करत आहे. त्यामळे महागाई, बेरोजगारी आणि भविष्यातील भीती निर्माण झाली आहे. भाजप आणि संघाचे नेते देशात फूट पाडत आहेत. जाणूनबुजून देशात भीती निर्माण करत आहेत.
नवी दिल्ली: केंद्र सरकार तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. माझी ईडीने (Ed) 55 तास चौकशी केली. मी ईडीला घाबरत नाही. तुम्ही माझी 55 तासच काय पाच वर्षही चौकशी करा. मला काहीच फरक पडत नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी भाजपला (bjp) ललकारले. रामलिला मैदानात महागाईच्या विरोधात हल्लाबोल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातच या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी हा हल्लाबोल केला.
यूपीए सरकारने 27 कोटी लोकांना दारिद्रय रेषेतून बाहेर काढलं आहे. भोजनाचा अधिकार, रोहयो, कर्जमाफी योजनेच्या माध्यामातून आम्ही हे उद्दिष्ट साध्य केलं होतं. परंतु आता मोदी सरकारने पु्हा 23 कोटी लोकांना परत दारिद्र्यात ढकलले आहे. जे काम आम्ही 10 वर्षात केलं होतं. ते त्यांनी 8 वर्षात संपुष्टात आणलं, असं राहुल गांधी म्हणाले. आमचे सर्वच मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळेच भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.
न्यायपालिकेवर दबाव
आमचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांचा माईक बंद केला जातो. आम्हाला बोलू दिलं जात नाही. निवडणूक आयोग, न्यायपालिकेवर सरकारचा दबाव आहे. त्यामुळेच आम्ही लोकांमध्ये जाऊन जनतेला देशाचं सत्य सांगणार आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने भारत जोडो यात्रा सुरू केली आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच या रॅलीतून त्यांनी 2024 निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहनही केलं.
भाजप आणि संघ फूट पाडतोय
देशात द्वेष निर्माण व्हावा म्हणून सरकार देशात भीतीचं वातावरण निर्माण करत आहे. त्यामळे महागाई, बेरोजगारी आणि भविष्यातील भीती निर्माण झाली आहे. भाजप आणि संघाचे नेते देशात फूट पाडत आहेत. जाणूनबुजून देशात भीती निर्माण करत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
केवळ दोनच उद्योगपतींना फायदा
या देशातल वाढणाऱ्या भीतीचा फायदा केवळ दोनच उद्योगपती उचलत आहेत. तुमची भीती आणि द्वेषाचा फायदा केवळ या दोनच हातात जात आहे. त्याचा गेल्या 8 वर्षात कुणालाही फायदा झालेला नाही. तेल, एअरपोर्ट, मोबाईलचं संपूर्ण सेक्टर या दोनच उद्योगपतींकडे जात आहे, असा दावाही त्यांनी केला.