मोठी बातमी ! भावी मुख्यमंत्री राज ठाकरे… शिवसेना भवनासमोरच मनसेची बॅनरबाजी
मनसेची आज शिवाजी पार्कात मोठी सभा होणार आहे. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार आहेत. या सभेची मनसेने जय्यत तयारीही केली आहे. पण त्यापूर्वीच शिवाजी पार्कातील शिवसेना भवनासमोर मनसेने लावलेले पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलतात? कुणाचे वस्त्रहरण करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आज गुढी पाडवाही असल्याने मनसेने शिवसेना भवन आणि दादर परिसरात प्रचंड बॅनरबाजी केली आहे. मनसेच्या शिवसेना भवनासमोरील काही पोस्टरमध्ये तर राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दादरमधील शिवसेना भवनासमोर हे मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मनसेच्या माहिम विधानसभा शाखेने हे बॅनर्स लावले आहेत. मनसेचे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर्स लावले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री… हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे… असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आला आहे. तसेच हिंदू बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. या बॅनर्सवर राज ठाकरे यांचा मोठा फोटो आहे. भगवी शाल अंगावर पांघरलेला राज ठाकरे यांचा हा फोटो आहे. तर खाली लक्ष्मण पाटील यांचाही फोटो आहे.
राजकीय चर्चांना उधाण
अगदी शिवसेना भवनाच्या समोरच हे मोठे बॅनर्स लावण्यात आल्याने हे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवाजी पार्क मैदानाकडे जाताना जिप्सी हॉटेलच्या समोर हे बॅनर्स दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. तसेच हा संपूर्ण परिसर भगव्या पतक्यांनी सजवला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. याशिवाय चलो शिवतीर्थ असे लिहिलेले सभेचे बॅनर्सही संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आले आहेत. मात्र, या बॅनर्समुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून राज ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून सादर केले जाणार का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.
राज यांच्या घरासमोरही बॅनरबाजी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या घरासमोरही झेंडे, बॅनरने पूर्ण परिसर सजला आहे. गुढी पाडवा आणि मराठी नववर्षा निमित्त आज शिवाजीपार्कवर राज ठाकरे यांची सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. नवा संकल्प, नवी दिशा घेऊन आज राज ठाकरे आपल्या घरावर यशाची गुढी उभारणार आहेत. सकाळपासूनच त्यांच्या घरासमोर, घरावर फुलांच्या माळा, मनसेचे झेंडे लावून पूर्ण परिसर सजवला आहे. सायंकाळी निघणाऱ्या या शोभा यात्रेसाठी ट्रकही सजल्या आहेत.