Raj Thackeray : ट्रेलर नाही गुढीपाडव्याला सिनेमाच दाखवतो, महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं वक्तव्य
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी पूर्ण सिनेमाच दाखवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर राज ठाकरे काय भूमिका मांडतात यावर राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.
पनवेल : राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी मराठी भाषा टिकवली पाहिजे. म्हणून वाचलं पाहिजे असं आवाहन केले. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करणं टाळलं. पण यावर सविस्तर गुढीपाडव्याचा दिवशी बोलणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘शिवतीर्थावर भूमिका मांडणार’
‘महाराष्ट्रात जे सुरु आहे. त्यावर मी २२ तारखेला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर बोलणार आहे. मला आता ट्रेलर दाखवायचा नाही. २२ तारखेला सिनेमाच दाखवणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला. महाराष्ट्र असा कधीही नव्हता. सगळ्या गोष्टी आमने-सामने असायच्या.’
‘बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणनिमित्त विधानभवनात गेलो होतो. तेव्हा समोर सगळेच बसले होते पण कोण कोणत्या पक्षात आहे हे कळतंच नव्हतं.’
‘…म्हणून तुम्ही वाचलं पाहिजे’
‘मराठी लोकांनी मराठी मासिके वाचली पाहिजेत. पण सगळ्या गोष्टी मोबाईलवर आहेत. पण बाहेरच्या लोकांनी वाचन थांबवलेलं नाही. मी खूप वाचतो असं नाही. पण वाचलं पाहिजे अन्यथा विचारांना तोकडेपणा येतो. नाहीतर घरातली मुले तो बाहेर शोधू लागतात. म्हणून तुम्ही वाचलं पाहिजे.’
‘तुमची मुळात ओळख काय. तर मी मराठी आहे. मराठी म्हणजे कोण तर मराठी बोलणारा व्यक्ती. भाषेने तुम्ही ओळखले जातात.’ असं ही राज ठाकरे म्हणाले.
‘मी सामना वाचत नाही’
मी सामना आणि मार्मिक वाचत नाही असं देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. माझ्याकडे दोन्ही येतात पण मी वाचत नाही. वाहिन्या तर मी पाहतच नाही. वर्तमानपत्रात हव्या तशा बातम्या आता येत नसल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी सांगितले की, ‘मनसेकडून ( MNS ) राजभाषा महोत्सव पनवेलमध्ये भरवण्यात आला आहे. आम्ही राज ठाकरे यांना विनंती केली होती की तुमची एक मुलाकात हवी आहे. त्या अनुषंगाने ते आज आले आणि एक मुलाखात दिली.’
‘मराठी भाषेचे महत्व नागरिकांना कळावं या अनुषंगाने हा महोत्सव भरण्यात आला होता. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत.’ असं देखील योगेश चिले यांनी म्हटले आहे.