Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवरील प्रेम पाहून झोप लागत नाही, जेवण जात नाही अन् कोडंही उलगडत नाही: रामदास कदम
Ramdas Kadam : मी फार संयम पाळला. प्रचंड संयम पाळला. मी काय चूक केली? माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत. मी नाही बोलणार. मी बोललो तर भूकंप होईल. मला तुटलेल्या गोष्टी जोडायच्या आहेत. तो प्रयत्न मी करणार आहे, असंही ते म्हणाले.
मुंबई: उद्धव ठाकरेंचं (uddhav thackeray) शरद पवारांवर एवढं प्रेम का हेच तर मला कळत नाही. कोडं उलगडत नाही. रात्री दोन दोन वाजता उठून बसतोय. झोप लागत नाही. जेवण जात नाही. तेच माझंही दुख आहे. आपला पक्ष फुटतोय. आपल्या पक्षात उभी फूट पडतेय. तरी उद्धव ठाकरे हे शरद पवारांना (sharad pawar) सोडत नाही. पक्ष संपला तरी चालेल. पण ते पवारांसोबत आहेत. हे का होतंय? नेमकं आजूबाजूला सांगणारे लोक कोण आहेत?, असा सवाल माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी केला आहे. रामदास कदम (ramdas kadam) यांनी पत्रकार परिषद घेऊन मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. त्याबाबतचे पुरावे मी उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. पण त्याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे आज हे दिवस पाहायला मिळाल्याचा दावा कदम यांनी केला.
उद्धव ठाकरे आजारी होते. ते बाहेर पडत नव्हते. त्याचा फायदा शरद पवार आणि अजितदादांनी घेतला. मी उद्धव ठाकरेंना एक पत्रं पाठवलं होतं. त्यात शरद पवार कुणबी समाजाला बोलवून कुणबी भवनासाठी 5 कोटी देतो. तुम्ही शिवसेना सोडून राष्ट्रवादीत या असं सांगत होते. एवढेच नाही तर त्यांनी कुणबी भवनासाठी पाच कोटी दिले. पैसे शासनाचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तरीही पवारांनी कुणबी लोकांना फोडलं आणि राष्ट्रवादीत घेतलं. मी उद्धव ठाकरेंना फोटो पाठवले. अजितदादा चेक देतानाचे फोटो दिले. जयंत पाटील सभा घेतानाचे फोटो दिले. मी सातत्याने हे साांगितलं. आमदारांनीही सांगितलं. पण त्याकडे लक्षच दिलं नाही, असं रामदास कदम म्हणाले.
तर पवारांनी शिवसेना संपवली असती
अजितदादा पडलेल्या आमदारांना बोलावून आमच्या मतदारसंघात पैसे देताहेत. आणि आम्हाला निधी मिळत नाही. प्रत्येक आमदार हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण उद्धव ठाकरे कुणाला भेटत नव्हते. एकनाथ शिंदेंनी सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही केला. पण उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवरील प्रेम काही कमी होत नव्हतं. मी एकनाथ शिंदेंचे आमदार मानतो. 51 आमदारांचे आभार मानतो, 12 खासदारांचे अभार मानतो. नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांचे आभार मानतो. त्यांनी हे पाऊल उचललं नसतं तर शरद पवार आणि अजित पवारांनी शिवसेना संपवली असती, असा दावाही त्यांनी केला.
मी बोललो तर भूकंप होईल
बाळासाहेबांची शिवसेना अभेद्य ठेवण्याचा भविष्यात माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल. पुन्हा भगवा फडकला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना वाढली पाहिजे. आता मी महाराष्ट्राच्या बाहेर पडणार. जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथे मी दौरे करणार. उद्धव ठाकरेंना एवढीच विनंती आहे की, मी नाईलाजाने मी राजीनामा दिला. मला समाधान नाही. माझ्या मुळावरच तुम्ही उठला. माझ्या मुलाला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करायला निघाला. आताही उठत आहात. मी फार संयम पाळला. प्रचंड संयम पाळला. मी काय चूक केली? माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत. मी नाही बोलणार. मी बोललो तर भूकंप होईल. मला तुटलेल्या गोष्टी जोडायच्या आहेत. तो प्रयत्न मी करणार आहे, असंही ते म्हणाले.