Refinery Project : रिफायनरी प्रकल्पाचा सर्व्हे सुरू, निलेश राणे येताच महिला आंदोलकांनी ताफा अडवला; बारसूत तणाव
Refinery Project : मागच्या महिन्यापासून वेगवेगळे सर्व्हे सुरू आहे. ही केवळ दोन दिवसांची घडामोड नाही. मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. ते वाढत जात आहे. वेस्टेड इंटरेस्ट असलेले किरकोळ लोकं आहेत. ते गडबड करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पोलीस प्रशासन आहे.
रत्नागिरी: बारसू (barsu) गावात गेल्या दोन दिवसांपासून रिफायनरी प्रकल्पाचे (refinery project) सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षण सुरू असलेल्या जागेची भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी आज पाहणी केली. निलेश राणे (nilesh rane) हे पाहणी करून जात असतानाच आंदोलकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रकल्पाला विरोध केला. या आंदोलकांनी निलेश राणे यांच्या वाहनांचा ताफा अडवला. या महिला आंदोलकांनी राणे यांना जाब विचारत ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी तुमचा विरोध आता देशभरात पोहचला आहे. तुम्ही किती काळ बसणार आहात. तुम्ही सांगा, त्या ठिकाणी येतो. तुमच्याशी संवाद साधतो. आपण चर्चेतून मार्ग काढू, असं निलेश राणे सांगत होते. तर आधी सर्व्हेचं काम बंद करा. तरच आम्ही जागेवरून उठू. हा प्रकल्प आमच्या गावात होताच कामा नये, असा आक्रमक पवित्रा आंदोलक महिलांनी घेतला. त्यामुळे निलेश राणे यांचीही काही काळ गोची झाली होती.
राज्यात सत्तापालट होताच पुन्हा एकदा रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. बारसू गावात गेल्या दोन दिवसापासून सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. ज्या जागेवर हा सर्व्हे सुरू आहे, त्या जागेची पाहणी करण्यासाठी निलेश राणे आज बारसू गावात आले होते. निलेश राणे आले तेव्हा या ठिकाणी आंदोलक नव्हते. राणे यांनी जागेची पाहणी केली. त्यानंतर त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवादही साधला. त्यानंतर निलेश राणे जात असतानाच आंदोलकांनी घटनास्थळी धाव घेऊन निलेश राणे यांचा ताफा अडवला. महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत निलेश राणे यांचाही निषेध नोंदवला. तसेच राज्य सरकारचाही निषेघ नोंदवला. आमच्या गावात रिफायनरी प्रकल्प नकोच. आम्हाला सुखाने जगू द्या. हा प्रकल्प रद्द केल्याशिवया आम्ही शांत बसणार नाही. आम्ही सर्व्हेक्षणही होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलक महिलांनी घेतला. या महिलांनी निलेश राणे यांच्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने निलेश राणे यांची चांगलीच भंबेरी उडाली.
आधी जोरदार, नंतर हतबल
निलेश राणे यांनी आधी मीडियाला जोरदार बाईट दिला. या ठिकाणी कोणी नसल्याचं पाहून त्यांनी हा प्रकल्प कसा चांगला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. काही किरकोळ लोकांचा प्रकल्पाला विरोध आहे. त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असल्याचं निलेश राणे म्हणाले. मात्र, जेव्हा आंदोलक प्रकल्पाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी निलेश राणे यांचा ताफा अडवताच निलेश राणेंची भंबेरी उडाली. तुमचा विरोध देशात गेला आहे. तुम्ही शांत व्हा. तुम्ही सांगाल त्या दिवशी, त्यावेळी आम्ही येऊ. तुमच्याशी चर्चा करू. आपण त्यातून मार्ग काढू. तुमचं म्हणणं सरकार समोर मांडू, असं निलेश राणे सांगत होते. मात्र, महिला ऐकायला तयार नव्हता.
निलेश राणेंची माफी
यावेळी आंदोलकाच्या नेत्याला निलेश राणे यांच्या कार्यकर्त्याने शिवीगाळ केली. त्यामुळे महिला आक्रमक झाल्या. त्यानंतर निलेश राणे यांनी जाहीरपणे माफी मागितली. आणि प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.
हे काही ठाकरे सरकार नाही
दरम्यान, आंदोलनापूर्वी निलेश राणे यांनी मीडियाशी संवाद साधला. रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेचं काम बारसू गावात कालपासून सुरू झालं आहे. अनेक दिवसांपासून वेगवेगळे सर्व्हे होत आहेत. सॉईलचा सर्व्हे होत आहे. एरियल सर्व्हे होत आहे. हे सर्व सर्व्हे मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. अधिकारी आणि ग्रामस्थांना विश्वास द्यायला आलोय. केंद्र आणि राज्य सरकार प्रकल्प आणत आहे. कुणाच्या काही अडचणी असतील तर त्या सांगा, त्यावर मार्ग काढू. विरोधाला विरोध करू नका. आम्ही ऐकायला तयार आहोत. हे काही ठाकरे सरकार नाही. पण प्रकल्प किती महत्त्वाचा आहे तो का आला पाहिजे. ते सांगण्याचं काम करत आहोत, असं निलेश राणे म्हणाले.
कुणाच्या परवानगीची गरज नाही
मागच्या महिन्यापासून वेगवेगळे सर्व्हे सुरू आहे. ही केवळ दोन दिवसांची घडामोड नाही. मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. ते वाढत जात आहे. वेस्टेड इंटरेस्ट असलेले किरकोळ लोकं आहेत. ते गडबड करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पोलीस प्रशासन आहे. महसूल प्रशासन आहे. ते योग्य ती कारवाई करतील. विरोधाला विरोध कोणी करणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल. काय म्हणणं आहे ते आमच्याकडे मांडा. काही किरकोळ गोष्टी असतील तर त्या सोडवू. जमीन मालक स्वत:हून आले. त्यांनी प्रकल्पाला मान्यता दिली आहे. एमआयडीसीची जमीन आहे. नोटिफाईड जमीन आहे. एमआयडीसीचे अधिकारी आहेत. ते इंटरनल सर्वेह करू शकतात. त्यांना कुणाच्या परवानगीची गरज नाही. शिवाय जमीन मालकांनीही परवानगी दिली आहे, असं त्यांनी सांगितलं.