Sanjay Raut ED Raid : संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता अधिक; शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान
Sanjay Raut ED Raid : याची प्रोसेज सहा महिन्यापासून सुरू होती. सहा महिन्याच्या प्रोसेज नंतर आजही मोठी कारवाई होत आहे. मला वाटतं यात राऊतांना अटक होण्याची शक्यता अधिक आहे. आम्हाला रेडे काय म्हटलं, पोस्टमार्टम करण्याची भाषा काय केली.
औरंगाबाद: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. पत्रा चाळ प्रकरणी ही धाड पडली आहे. गेल्या तीन तासांपासून राऊत यांच्या घरात ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. तब्बल दहा ईडीच्या (ED Team) अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरू आहे. ही चौकशी किती तास चालेल याची काहीच माहिती मिळत नाही. मात्र, झाडाझडतीनंतर राऊत यांना ईडी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट (sanjay shirsat) यांनीही राऊत यांना अटक होण्याची शक्यता असल्याचं विधान केलं आहे. शिरसाट यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू होती, असा दावाही शिरसाट यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिरसाट हे टीव्ही9 मराठीशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हे दावे केले आहेत.
याची प्रोसेज सहा महिन्यापासून सुरू होती. सहा महिन्याच्या प्रोसेज नंतर आजही मोठी कारवाई होत आहे. मला वाटतं यात राऊतांना अटक होण्याची शक्यता अधिक आहे. आम्हाला रेडे काय म्हटलं, पोस्टमार्टम करण्याची भाषा काय केली. ते कोणत्या अविर्भावात बोलत होते ते माहीत नाही. परंतु जैसी करनी वैसी भरनी त्यांच्यावर झाली आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याचा आनंद नाही. परंतु शिवसेना फोडण्यात ज्याचा सक्रिय सहभाग होता, त्यांच्यावर कारवाई झाल्याने आम्ही समाधानी आहोत, असं संजय शिरसाट म्हणाले.
शिवसैनिक आनंदित
संजय राऊत हे हुशार नेते आहेत. त्यांना कशाची भिती वाटत नाही. त्यांना आत्मविश्वास आहे. एवढी मोठी धाड पडते म्हणजे अटकेची शक्यता आहे. या कारवाईमुळे शिवसैनिक आज आनंदित झाला असेल. ज्याच्यामुळे शिवसेना फुटली त्यावर आज कारवाई करण्यात आली. हे कायद्याच राज्य आहे. यात सूड कसले? असा सवाल करतानाच जर काही केल नसेल तर त्यांना काही होणार नाही, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतील
राऊतांनी बाळासाहेबांची शपथ घ्यायला नव्हती पाहिजे. ते एवढे मोठे नाहीत. त्यांना तो अधिकार नाही. आम्ही लढणारे शिवसैनिक आहोत. आम्हाला तो अधिकार आहे. ते नोकरी करून नेते झाले आहेत. त्यामुळे त्यांना तो अधिकार नाही. उद्धव साहेब त्यांना एक दिवस बाहेरचा रस्ता दाखवतील, असा दावाही त्यांनी केला.
पवारांच्या नादी लागून सेना फोडली
संजय राऊतांनी शरद पवारांच्या नादी लागून शिवसेनेची वाट लावली. आम्ही काही सांगितलं तर पवारांसोबत जाणं कसं चांगलं आहे हे पटवून द्यायचं का ते करायचे. त्याचाच हा परिणाम आहे. त्यामुळे सर्व आमदार फुटले. त्याच कारणच संजय राऊत आहे. डायलॉग बोलायला सोपे असतात. आमचे पोस्टमार्टम करायला चालले होते. त्यांच्यावरच धाड पडली आहे, असं ते म्हणाले.