Sanjay Raut | गोव्यात गेले अन् फुट पडली, राऊतांचा फडणवीसांवर पलटवार, गोव्यात काय काय घडणार?
महाराष्ट्रातून नोटांनी भरलेल्या बॅगा गोव्यात जात आहेत. आमची लढाई याच नोटांसोबत आहे. फडणवीस गोव्यात गेले अन् तिथे भाजपत फूट पडली, असा टोला राऊत यांनी लगावला, ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
मुंबई : गोवा विधानसभा (Goa Election) निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातून नोटांनी भरलेल्या बॅगा गोव्यात जात आहेत. आमची लढाई याच नोटांसोबत आहे. फडणवीस गोव्यात गेले अन् तिथे भाजपत फूट पडली, असा टोला राऊत यांनी लगावला, ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला
गोव्यात भाजपला गळती लागली असून अनेक आमदार, नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. असे असले तरी दुसरीकडे गोवा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या शिवसेनेवर भाजपकडून टीका केली जातेय. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी गोव्यात शिवसेनेची लढाई ही नोटासोबत असते. अनामत रक्कम जप्त न होण्यासाठी त्यांची लढाई असते, अशी खोचक टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला राऊत यांनी समर्पक उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून तिकडे गेले आहेत. फडणवीस गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला. काल एका मंत्र्याने पक्षाचा त्याग केला. भाजपचे आमदार प्रविण झाटे यांनींही पक्ष सोडला. त्यांनी पक्षातील युद्ध जे सुरु आहे, त्याची लढाई करावी, असे राऊत म्हणाले.
भाजपकडून गोव्यात नोटांचा पाऊस
पुढे बोलताना गोव्यात आमची लढाई नोटांशी आहे. भाजपचे लोक महाराष्ट्रातून गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत. महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा जात आहेत. शिवसेना गोव्यात या नोटांशी नक्की लढेल. शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा, हिंदुत्ववादी पक्ष आहे. शिवसेना फडणवीसांच्या नोटांना पुरून उरेल. मी फडणवीस यांना सांगेन की तुम्ही कितीही नोटा टाका. शिवसेना गोव्यात नक्की लढेल, असे राऊत म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये सत्ताबदल होणार
तसेच, भारतीय जनता पक्षाला लागलेली गळती ही सुरुवात आहे. ओपिनियन पोलमध्ये सांगितलं जात आहे की भाजप उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सत्तेवर येणार आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सत्तेवर येणाऱ्या पक्षाला कधी गळती लागत नाहीत. आमदार, मंत्री प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडत नाहीत. मात्र उत्तर प्रदेशचा राजकीय प्रवास हा परिवर्तनाचा सुरु आहे, असे म्हणत राऊत यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्ताबदल होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
इतर बातम्या :
मोठी बातमी : पाच राज्यातल्या निवडणुकांसाठी शरद पवार मैदानात, प्रेस कॉन्फरन्समध्ये मेगा प्लॅन मांडला
Goa Election 2022: गोव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार; काय म्हणाले पवार?
पाच राज्यातल्या निवडणुकांसाठी शरद पवार मैदानात, प्रेस कॉन्फरन्समध्ये मेगा प्लॅन मांडला