ठाकरे सरकारची वर्षपूर्ती, उद्धव ठाकरेंची लवकरच मुलाखत; राऊतांनी सस्पेन्स वाढवला!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्षपूर्ण झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून ही मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. (Sanjay Raut Interviews CM Uddhav Thackeray For Shiv Sena Mouthpiece)
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्षपूर्ण झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून ही मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार आहे. कोरोनाचं संकट, ईडीच्या चौकश्या, मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरून झालेलं राजकारण, सत्ता बदलाचे विरोधकांकडून होत असलेले दावे आणि बिहार विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत काय भाष्य केलं? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र, राऊत यांनी मुलाखतीचे मुद्दे गुलदस्त्यात ठेवल्याने या मुलाखतीचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे. (Sanjay Raut Interviews CM Uddhav Thackeray For Shiv Sena Mouthpiece)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुलाखत घेतानाचे तीन फोटो शेअर केले आहेत. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षपूर्ती मुलाखत. लवकरच…’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत दैनिक ‘सामना’तून प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी केल्यानंतर विरोधी विचारसरणीचे हे तिन्ही पक्ष जास्त काळ एकत्र राहणार नाहीत. सहा महिन्यात हे सरकार पडेल, असं भाजपकडून बोललं जात होतं. मात्र, ठाकरे सरकारनं एक वर्षपूर्ण केल्याने विरोधकांच्या या आरोपांचाही उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरी शैलीत समाचार घेतला असावा, असा अंदाज राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी राज्याची सत्ता हातात घेतल्यापासून या सरकारला सातत्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, त्यामुळे उद्योगधंदे बंद होऊन रुतलेलं आर्थिक चक्र, त्यानंतर आलेलं वादळ, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील पूरस्थिती आदी नैसर्गिक संकटाना राज्याला सामोरे जावं लागलं. राज्य सरकार या संकटाचा सामना करत असतानाच विरोधकांकडून मंदिर उघडण्यासाठी आणि रेल्वे सुरू करण्यासाठी आंदोलनं करण्यात आली. पालघर साधू हत्याकांड, अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरण आणि कंगना रनौत यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेली शाब्दिक चकमक आदी गोष्टींचाही या सरकारला सामना करावा लागला. त्यातच आता विरोधी पक्ष असेल्या भाजपकडून राज्यात दोन महिन्यात सत्ता बदल होणार असल्याचे दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे काय बोलतात, विरोधकांचा कसा समाचार घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
याशिवाय कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकारने केलेल्या कामाचा आढावाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीतून मांडल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवाय मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर आणि या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत करायच्या आघाडीवरही उद्धव ठाकरे भाष्य केलं असावं, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी नेमकं कोणत्या विषयावर भाष्य केलं हे समजणार आहे. मात्र, नेहमीप्रमाणे ही मुलाखत परखड आणि वादळी असेल असंही सांगण्यात येतं. (Sanjay Raut Interviews CM Uddhav Thackeray For Shiv Sena Mouthpiece)
36 जिल्हे 72 बातम्या | 25 November 2020https://t.co/lKIxTJOCSx
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 25, 2020
संबंधित बातम्या:
आशिष शेलारांनी कंबर कसली, हैदराबादेतील मराठी मतं खेचण्याचा भाजपचा प्रयत्न
भाजपच्या 120 नेत्यांची यादी देतो, तुमच्याही चौकशा होऊन जाऊ द्या, संजय राऊतांनी ललकारले
जेवढ्या चौकशा करायच्या तेवढ्या करा, महाराष्ट्रातही आमची सत्ता आहे हे लक्षात ठेवा; राऊतांचा इशारा
(Sanjay Raut Interviews CM Uddhav Thackeray For Shiv Sena Mouthpiece)