कोर्टाच्या दारातच विधानसभेच्या ‘त्या’ जागेवर चर्चा, गणित समजावलं; संजय राऊत आणि रमेश कदम यांच्यातील चर्चा काय?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज सेशन्स कोर्टात आले होते. यावेळी त्यांची माजी आमदार रमेश कदम यांच्याशी भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघाबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे जागा वाटपाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. कुणाला किती जागा सोडायच्या हे ठरत आहे. जागांची अदलाबदलीही होत आहे. निवडणुका असल्यामुळे लोक एकमेकांच्या संपर्कात आहेत. गाठीभेटी घेऊन चर्चा करत आहेत. मिळेल त्या ठिकाणी राजकीय नेते भेटल्यावर निवडणुकीवर चर्चा करत आहेत. आज ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत आणि माजी आमदार रमेश कदम हे कोर्टाच्या बाहेरच भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. खासकरून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
खासदार संजय राऊत हे सेशन्स कोर्टात आले होते. त्यावेळी माजी आमदार रमेश कदमही सेशन कोर्टात होते. यावेळी योगायोगाने या दोन्ही नेत्यांची भेट झाली. संजय राऊत यांनी रमेश कदम यांच्या प्रकृतीची आणि हालहवालाची विचारपूस केली. अवघे 15 ते 20 मिनिटे हे दोन्ही नेते कोर्टाच्या आवारात गप्पा मारत होते. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी राजकीय चर्चा झाली. रमेश कदम यांनी खासकरून मोहोळ विधानसभा मतदारसंघावर राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यांना मोहोळचं गणित समजावून सांगितलं.
योगायोगाने भेट झाली
2019मध्ये तुरुंगात असताना मी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आताही 2024च्या विधानसभेची निवडणूक मी लढवणार आहे, असं सांगतानाच आज कोर्टामध्ये माझी देखील केस होती. संजय राऊत यांची देखील कोर्टात मॅटर होता. त्यामुळे आमची ही योगायोग भेट झाली, असं रमेश कदम म्हणाले.
राऊत यांना परत भेटणार
संजय राऊत यांच्यासोबत मोहोळ विधानसभा मतदारसंघावर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीत मोहोळ विधानसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाईल हे पाहावं लागेल. त्यानंतर या मतदारसंघाबाबत बोलणं उचित ठरेल. मोहोळ विधानसभा राष्ट्रवादी की शिवसेना लढणार याचा अद्याप निर्णय झालेला नाही. पण या जागे संदर्भात मी संजय राऊत यांना पुन्हा भेटणार आहे आणि चर्चा करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
योग्यवेळी योग्य निर्णय होणार
संजय राऊत यांना मोहोळ विधानसभेचं गणित समजावून सांगितलं आहे. तुरुंगात राहून मला मोहोळमधून 25 हजार मते पडली. उद्या जर एखाद्या पक्षाने मला तिकीट दिलं तर त्या पक्षाची 50 हजार मते एकत्र केल्यास मला 80 ते 90 हजार मते मिळतील. त्यामुळे त्या पक्षाचा आमदार सहज निवडून येऊ शकतो. कारण 25 हजार मते ही माझी हक्काची आहे. त्यामुळे निश्चितपणाने मला तिथून खूप चांगल्या पद्धतीच्या आशा आहे, असं रमेश कदम म्हणाले. या संदर्भात शरद पवार यांना देखील मी भेटलो आहे. मी त्या मतदारसंघातून इच्छुक आहे असं देखील सांगितलं आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असं शरद पवार यांनीही मला आश्वासन दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
कोणताही खटला सुरू नाही
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळा प्रकरणात कुठलाही खटला आणि ट्रायल सुरू नाही. याप्रकरणी खूप वेळ लागणार आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर मी अपक्ष म्हणून मोहोळ विधानसभा मतदारसंघात उभा राहिलो होतो. या मतदारसंघात माझं काम सुरू आहे. सध्या कोणत्याही पक्षात मी काम करत नाही. मी अपक्ष म्हणूनच माझं काम सुरू ठेवलं आहे, असं रमेश कदम म्हणाले.