शिवसेना यूपीएत असणार का? पुढील 24 तासांत सांगणार, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य
काही चर्चा चार भिंतीत असतात, त्या वरिष्ठांशीच करायच्या असतात. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंशी बोलून त्यांनी परवानगी दिली तर मी तुमच्याशी बोलेन. राहुल गांधी यांच्याशी आज प्रदीर्घ चर्चा झाली. काही वेळ वेणुगोपालही सहभागी झाले होते. या भेटीत देशपातळीवर अनेक मुद्दे, पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
नवी दिल्ली : ममता बॅनर्जींचा मुंबई दौरा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक, राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसवरील घणाघाती टीका, या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. राऊत आणि राहुल गांधी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive Alliance) अर्थात यूपीएमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला जातोय. मात्र, राहुल गांधी यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी बोलून आणि त्यांनी परवानगी दिली तर मी तुम्हाला माहिती देईल, असं सूचक वक्तव्य राऊत यांनी दिलं आहे.
काही चर्चा चार भिंतीत असतात, त्या वरिष्ठांशीच करायच्या असतात. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंशी बोलून त्यांनी परवानगी दिली तर मी तुमच्याशी बोलेन. राहुल गांधी यांच्याशी आज प्रदीर्घ चर्चा झाली. काही वेळ वेणुगोपालही सहभागी झाले होते. या भेटीत देशपातळीवर अनेक मुद्दे, पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
‘राहुल गांधी उद्धव ठाकरेंची भेट घेणार’
तसंच राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. काल सोनिया गांधी यांची भेट झाली त्यावेळी त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राहुल गांधी यांचा मुंबई दौरा ठरतोय. तेव्हा ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतील अशी शक्यता आहे. राहुल गांधी यांनी तशी इच्छा व्यक्त केल्याचंही राऊत यांनी सांगितलं.
‘विरोधकांचं संघटन उभं राहावं आणि ते एकच असावं’
राहुल गांधी यांच्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत थोडीफार नक्कीच चर्चा झाली. भाजपविरोधात विरोधकांचं संघटन उभं राहावं आणि ते एकच संघटन असावं असं आमचं मत आहे. राहुल गांधी यांचंही तेच मत आहे. भाजपला समर्थ पर्याय म्हणून वेगवेगळ्या आघाड्या स्थापन न करता ती एकच असावी असं त्यांचंही मत असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले. आम्ही आज महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवत आहोत. ती एक मिनी यूपीएच आहे. भिन्न विचाराचे पक्ष एकत्र येऊन सरकार चालवतात तेव्हा ती एक वेगळी आघाडीच असते. एनडीएतही हिंदुत्वाला विरोध करणारे, राम मंदिराच्या लढ्याला विरोध करणारे पक्ष आणि नेते काम करत होते. त्यामुळे त्यावेळी अटलजींना समान नागरी कायदा आणि राम मंदिराचा मुद्दा काही काळ बाजूला ठेवावा लागला होता, असं राऊत म्हणाले.
‘सर्वपक्षीय आघाडीचे नेतृत्व कुणाकडे हे मोठे नेते ठरवतील’
राहुल गांधी यांच्याशी उत्तर प्रदेश, गोवा राज्यातील निवडणुकीबाबत चर्चा झाली. त्या चर्चेतील विषय आधी उद्धवजींच्या कानावर घालेन. त्यानंतर मी पुढील 24 तासात माध्यमांशी बोलेन. उद्या प्रियंका गांधी यांच्यासोबतची भेट नक्की आहे. सर्वपक्षीय आघाडीचे नेतृत्व कुणाकडे हे मोठे नेते ठरवतील, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
इतर बातम्या :