Rajya Sabha Election 2022: ते मनमोकळे आहेत, ज्या ठाकूरांना कालच्या बैठकीचं निमंत्रणही नव्हतं, त्यांच्याबद्दल आज राऊत भरभरुन बोलले!
Rajya Sabha Election 2022: हितेंद्र ठाकूर आमच्या परिवारातील आहेत. अत्यंत मनमोकळे नेते आहेत. ते परखड आणि स्पष्ट बोलणारे आहे. त्यांच्याशी संवाद सुरू आहे. त्यांच्या भागातील विकास कामांसाठी त्यांचा आग्रह असतो. तो आग्रह योग्य आहे, असं राऊत म्हणाले.
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत (rajya sabha election) दगाफटका होऊ नये म्हणून महाविकास आघाडीने (maha vikas aghadi) काल बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला मित्रपक्ष आणि अपक्ष आमदारांना पाचारण करण्यात आलं होतं. या बैठकीला हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला बोलावण्यात आलं नव्हतं. ठाकूर यांनीही आम्हाला निमंत्रण देण्यात आलं नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळे बविआची मते कुणाला मिळणार याची चर्चा रंगलेली असतानाच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज ठाकूर यांच्यावर कौतुकांचा वर्षावर केला. ठाकूर हे मनमोकळे आहेत. ते परखड आणि स्पष्ट बोलणारे नेते आहेत. त्यांचा त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांबाबत कायम आग्रह असतो आणि त्यात काही गैर नाही, असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे बविआसोबत शिवसेनेचा संवाद सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बविआच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हितेंद्र ठाकूरांवर कौतुकांचा वर्षाव केला. हितेंद्र ठाकूर आमच्या परिवारातील आहेत. अत्यंत मनमोकळे नेते आहेत. ते परखड आणि स्पष्ट बोलणारे आहे. त्यांच्याशी संवाद सुरू आहे. त्यांच्या भागातील विकास कामांसाठी त्यांचा आग्रह असतो. तो आग्रह योग्य आहे, असं राऊत म्हणाले.
सपाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा झालीय
सरकार स्थापन करताना जे घटक पक्ष सोबत होते. ते आजही आमच्यासोबत आहेत. कालच्या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी स्पष्ट केलं. काही लहानसहान गोष्टी असतील तर त्या दूर करण्याच्या सूचना पवारांनी दिल्या आहेत. सर्व घटकपक्ष सोबतच आहे. 10 तारखेला कोण कुणाला मतदान करतंय ते कळेल, असं त्यांनी सांगितलं. समाजवादी पार्टीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली आहे. महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमावर चाललं आहे. त्यामुळे त्यांचाही पाठिंबा मिळेल असं ते म्हणाले.
रावते, देसाईंनी पक्षाला आयुष्य दिलं
दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांचा विधान परिषदेतील पत्ताकट झाला का? असा सवाल करण्यात आला होता. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पत्ताकट शब्द चुकीचा आहे. रावते, देसाई हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी वर्षानुवर्ष शिवसेनेत काम केलं आहे. त्यांनी पक्षासाठी संपूर्ण आयुष्य दिलं आहे. पक्षाचे काही निर्णय असतात. त्या प्रवाहात हे दोन्ही नेते सहभागी असतात. त्यामुळे पत्ताकट हा शब्द वापरणं योग्य नाह. पक्ष त्यांना मोठी जबाबदारी देणार. त्यांचं कार्य खूप मोठं आहे, असंही ते म्हणाले.