शिंदे यांचा खुळखुळा झालाय, केंद्रानेच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रोखला; संजय राऊत यांचा मोठा दावा
कृषी खात्यात प्रचंड घोटाळा आहे. तो पाहिला तर मला शेतकऱ्यांची आणि कृषी खात्याची दया येते. बोगस धाड करणारे त्यांचीच माणसे आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री काहीच करणार नाही. ते मंत्री आणि आमदारांचेच मिंधे आहेत.
नवी दिल्ली : राज्य सरकारमध्ये अजिबात काही अलबेल नाहीये. अलबेल असतं तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रोखला गेला नसता. एक वर्ष झालं तरी विस्तार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार केंद्राने रोखला आहे. हा विस्तार भाजपने रोखला आहे, असा मोठा दावा करतानाच एकनाथ शिंदे यांच्या हातात काही नाही. शिंदे हा खुळखुळा झाला आहे. ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्या हातात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे अधिकार आहेत, ना राज्याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार. त्यांना एकच आदेश आहे. भ्रष्ट मंत्र्यांना आधी बाहेर काढा आणि मग विस्तार करा, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.
आमची जोडी म्हणजे फेव्हिकॉल का जोड आहे, असं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. फेव्हिकॉलच्या ट्यूब आहे ते पाहावं लागेल. फेव्हिकॉल आहे की मधाचे चार थेंब आहेत हे पाहावे लागेल. फडणवीस यांच्या प्रवक्त्याने बेडकाची उपमा दिली. मग हा फेव्हिकॉलचा जोड म्हणायचा? काल तर सीएम आणि डीसीएम एकमेकांकडे पाहायला तयार नव्हते. कसला फेव्हिकॉल का जोड आहे? जोडबिड काही नाही. पुढच्या दोन महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागेल. त्यानंतर सरकार जाईल, असं संजय राऊत म्हणाले.
आम्ही दुधखुळे नाही
संजय राऊत यांना धमकीचे फोन आले होते. हा राऊत यांचाच बनाव असल्याचं भाजपकडून म्हटलं गेलंय. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बनाव रचून काय करायचं? असे बनाव मूर्ख लोक रचतात. वर्षभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. मधल्या काळात पुण्यात एक व्यक्ती पकडली. ती रावसाहेब दानवे यांच्या गावातील होती. त्याचा फोटो दानवेंसोबत होता. म्हणून काय दानवेंनी बनाव रचला का? त्या आधी चार व्यक्ती पकडले.
मयूर शिंदेचा माझ्या बरोबर फोटो असेल. पण त्याने रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते मिंधे गटात आहेत. जर तो बनाव असता तर फोन नंबरसह पोलिसांना कळवलं नसतं. मला धमक्या येत आहेत. अलिकडे फोन नंबरवरून माणसं ट्रेस होतात. लोकेशन ट्रेस होते. हे न समजण्या इतके आम्ही दूधखुळे नाही आहोत? असं राऊत म्हणाले.
लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी
हा त्यांचा बनाव असेल. सर्व लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी. ठाणे शहरातील गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक पोलिसांच्या मदतीने एक तर मिंधे गटात गेले किंवा भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांचे गुंड माझ्यासाठी कशाला काम करतील? हा माझा साधा प्रश्न त्यांना आहे. कालही एका माणसाला पकडलंय. तो वेगळ्याच कोणत्या तरी गँगचा माणूस आहे. 72 तास जे जाहिरात कांड झालं. त्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी काल हा बनाव करण्यात आला अशी माझी माहिती आहे. मी कधीही पोलिसांकडे सुरक्षा मागितली नाही. माझ्या आयुष्यात कधीही सुरक्षा मागितली नाही, असंही ते म्हणाले.
विश्वास कसा ठेवणार?
माझ्याकडे आलेले नंबर मी नेहमीप्रमाणे पोलिसांना पाठवले. त्यांनी आरोपी खरे की खोटे पकडले हे माहीत नाही. बनावट पकडले असेल आणि कथानक तयार केलं असेल. या सरकारचा भरवसा नाही. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? काही गुन्हेगारांवर अनेक गुन्हे असतात. ते दबावात असतात ते गुन्हा कबुल करतात, असंही त्यांनी सांगितलं.